Vikas Lawande – वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण मुदतवाढीचा अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला. लवांडे यांच्यावर प्रलंबित असलेल्या एकूण गुन्ह्यांची माहिती न दिल्याने न्यायालयाने त्यांचे अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेतले. लवांडे यांच्यावर नऊ मे रोजी लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथे शाईफेक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह एकूण चौदा जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा आहे, तर वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी लवांडे यांच्यावर वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. याबाबत नलिनी आशिष वायाळ (वय ४१, रा. येरवडा) यांनी तक्रार दिली आहे. या गुन्ह्यात लवांडे यांना पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० मे पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात वाघोली पोलिसांसह सरकार पक्ष व तपास अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. लवांडे यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जात त्यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या चार गुन्ह्यांची माहिती दिली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांचे अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेण्यात यावे, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने लवांडे यांचे अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेतले आहे. याप्रकरणी आता २५ मे ला सुनावणी होणार आहे.