चेन्नई : भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के.अण्णामलाई यांनी आघाडीचे अभिनेते विजय यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) हा विजय यांचा पक्ष सत्तारूढ द्रमुकची बी-टीम आहे. टीव्हीके म्हणजे द्रमुकचा सत्ता राखण्यासाठीचा सिक्रेट प्रोजेक्ट (गुप्त राजकीय डाव) आहे, असा दावा त्यांनी केला. टीव्हीकेकडून सातत्याने भाजपवर टीका केली जात आहे. त्यावरून अण्णामलाई यांनी पलटवार केला. भाजप जमिनीवर सक्रिय राहून कार्य करतो. जनहितासाठी आम्ही लढतो. त्याउलट, विजय केवळ चित्रपटांच्या पडद्यावर ॲक्टिंग करतात. ते वर्क फ्रॉम होम राजकारणी आहेत. त्यांनीही जमिनीवर उतरून कार्य करावे, असे आव्हान अण्णामलाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. तमिळनाडूत मोठा चाहतावर्ग असणारे विजय राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी पक्ष स्थापून इतर प्रमुख पक्षांपुढे आव्हान उभे केल्याचे मानले जाते. तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्या राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातून राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे.