माधव विद्वांस ग्वाल्हेरच्या राजमाता कै. विजयाराजे शिंदे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1919 रोजी मध्य प्रदेशातील सागर येथे झाला. त्यावेळचे उपजिल्हाधिकारी व राजघराण्यातील ठाकूर महेंद्र सिंग हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे त्यांचे जन्माचे वेळीच निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. अत्यंत शिस्त तसेच धार्मिक वातावरणामध्ये त्यांचे संगोपन झाले. सुरुवातीला त्यांचे शिक्षण घरीच झाले. नंतर त्यांनी बनारस येथील वसंत कॉलेज आणि लखनौच्या इसाबेला थोबर्न कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. विवाहापूर्वी त्यांचे नाव लेखा दिव्येश्वरीदेवी असे होते. वयाच्या 22व्या वर्षी त्यांचा ग्वाल्हेरचे महाराजा जिवाजीराव शिंदे यांच्याशी विवाह झाला. त्यांचे विजयाराजे शिंदे असे विवाहोत्तर नाव झाले. दिवंगत माधवराव शिंदे, वसुंधराराजे (राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री), पद्मावतीराजे, उषाराजे, यशोधराराजे ही त्यांची अपत्ये तर माजी मंत्री व खासदार ज्योतिरादित्यराजे हे त्यांचे नातू होत. त्या मध्य प्रदेशातील भाजपाच्या (पूर्वीचा जनसंघ) आधारस्तंभ होत्या. सुरुवातीस त्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेचे चांगलंच प्रस्थ होते. हिंदू महासभेला महाराजा जिवाजीराव यांनीदेखील संरक्षण दिलं होतं. त्यामुळे इथे कॉंग्रेस पक्ष कमकुवत होता. कालांतराने राजमाता सिंधिया यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतरच राजमाता विजयाराजे यांनी कॉंग्रेसकडून 1957 मध्ये निवडणूक लढविली. त्या 1957 मध्ये गुणा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. सन 1962 मध्ये त्यांनी ग्वाल्हेर मतदारसंघातून कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूक जिंकली. 1967 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचा त्याग केला व स्वतंत्र पक्षाकडून निवडणूक जिंकली. त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन जनसंघामार्फत विधानसभेवर निवडून आल्या व त्या मध्य प्रदेशच्या राजकारणात क्रियाशील झाल्या. त्यांनी यावेळी मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ केली. विजयाराजे वर्ष 1971 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील भिंड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनसंघ पक्षाच्या उमेदवार म्हणून तर 1989, 1991, 1996 आणि 1998च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुणा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. 40 वर्षे त्या भारताच्या राजकारणात सक्रिय होत्या. 1980 मध्ये प्रख्यात लेखक मनोहर माळगावकर यांच्या सहकार्याने विजयाराजे यांनी आत्मचरित्र लिहिले. “ग्वाल्हेरची शेवटची महाराणी’ या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. हिंदी भाषेतील विजयाराजे सिंधिया यांचे मृदुला सिन्हा यांनी “एक थी रानी ऐसी भी’ या नावाने लिहिले आहे. याच नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. 25 जानेवारी 2001 रोजी त्यांचे निधन झाले.