Wai: वाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात
Wai पागा तालीम मैदानातून प्रार्थनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सघोष पथसंचलनास प्रारंभ झाला. जैन मंदिर, चावडी चौक, यंग रविवार, सरकारी दवाखाना, किसनवीर चौक, मराठी विश्वकोश, शाहीर चौक, भगवा कट्टा आणि नगरपालिका मार्गे संचलन पुन्हा जैन मंदिरमार्गे पागा तालीम मैदानावर पोहोचले. याठिकाणी संचलनाचा समारोप झाला.

Wai: वाई शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सव दोन टप्प्यांत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शस्त्रपूजन आणि सघोष पथसंचलनाच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी शिस्त, एकजूट, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
रविवार, दि. 18 रोजी सायंकाळी पागा तालीम येथील मैदानावर शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय युवाशक्ती ट्रस्टच्या वाई विभागाचे अध्यक्ष अजित क्षीरसागर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह महेश करपे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी संघाचे वाई तालुका कार्यवाह शैलेश सकटे यांनी प्रास्ताविकात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वाई तालुक्यात सुरू असलेल्या संघकार्याचा आढावा घेतला. स्वयंसेवकांकडून विविध प्रात्यक्षिके, घोष प्रात्यक्षिके, पद्य आणि अमृतवचन सादर करण्यात आले. अजित क्षीरसागर यांनी उपस्थित स्वयंसेवक व नागरिकांना राष्ट्रनिष्ठा, सामाजिक एकात्मता आणि समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी महेश करपे म्हणाले, संघाच्या स्थापनेपासून या उत्सवाला विशेष स्थान असून, त्यातून शिस्त, संघटनशक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक कार्यात कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध, नागरिक कर्तव्ये आणि पर्यावरण संवर्धन या पंचपरिवर्तनाच्या सूत्रांना महत्त्व आहे. या विचारांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. शाखाविस्ताराबरोबरच पंचपरिवर्तनाचे विचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवून सामाजिक जागृती निर्माण करणे, हीच राष्ट्रसेवा आहे. भगव्या ध्वजाला प्रणाम आणि ध्वजावतरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सघोष पथसंचलनातून शिस्तीचे दर्शन
पागा तालीम मैदानातून प्रार्थनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सघोष पथसंचलनास प्रारंभ झाला. जैन मंदिर, चावडी चौक, यंग रविवार, सरकारी दवाखाना, किसनवीर चौक, मराठी विश्वकोश, शाहीर चौक, भगवा कट्टा आणि नगरपालिका मार्गे संचलन पुन्हा जैन मंदिरमार्गे पागा तालीम मैदानावर पोहोचले. याठिकाणी संचलनाचा समारोप झाला.
पथसंचलनाच्या मार्गावर नागरिकांनी स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच ठिकठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले होते. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलनात सहभाग घेतल्याने शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. या संचलनातून स्वयंसेवकांची शिस्त, एकजूट, संघटनभावना आणि सामाजिक समरसतेचे दर्शन घडले. यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत उपस्थित होते.





