विजया, देना बॅंकेचे बडोदा बॅंकेत एकत्रिकरण पूर्ण

मुंबई – देना बॅंक व विजया बॅंक यांच्या एकूण 3 हजार 898 शाखांचे एकत्रिकरण करून घेण्याचे काम बॅंक ऑफ बडोदाने पूर्ण केले आहे. ही प्रक्रिया मुदतीपेक्षा अगोदरच पूर्ण झाली आहे. आता बॅंक ऑफ बडोदा ही मालमत्तेच्या दृष्टीने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी मोठी बॅंक झाली आहे.
या प्रक्रियेमध्ये 5 कोटींहून अधिक ग्राहकांची खाती स्थलांतरीत करण्यात आली. शाखांचे एकत्रिकरण करण्याबरोबरच, सर्व एटीएम, पीओएस मशीन्स व क्रेडिट कार्डस यांचेदेखील स्थलांतर पूर्ण झाले. विलिनीकरणानंतर आता सर्व ग्राहकांना देशभरातील एकूण 8 हजार 248 देशांतर्गत शाखा व 10 हजार 318 एटीएम यांचा वापर करता येणार आहे.
बॅंक ऑफ बडोदाची सर्व प्रकारची उत्पादने व सेवा यांचा लाभ या सर्व ग्राहकांना घेता येईल. तसेच, या सर्वांना बडोदा कनेक्ट, एम-कनेक्ट प्लस यांसारख्या सुलभ, वापरण्यास सोप्या व शाखांमध्ये मिळू शकणाऱ्या वैशिष्ट्यांनी युक्त अशा सुविधा मिळू शकणार आहेत. त्यांना घरबसल्या बॅंकिंगच्या सेवा उपभोगता येणार आहेत. देना व विजया या पूर्वाश्रमींच्या बॅंकांनी आपल्या ग्राहकांना दिलेली डेबिट कार्डे यापुढेही कार्डावरील मुदतीच्या काळात चालू राहतील.
बॅंक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव चढ्ढा म्हणाले, एकत्रिकरणाची प्रक्रिया यशस्वी पार पडल्याने, कामकाजातील समन्वयाव्यतिरिक्त, तिन्ही बॅंकांच्या या विलिनीकणाचे फायदे एकत्रित मिळवून देण्यासाठी आमची बॅंक सज्ज झाली आहे.





