मुंबई : राज्य दिवाळखोरीत निघाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी रेवडी वाटल्या जात आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती न बघता केवळ सत्ता मिळवण्यासाठी राज्याचे वाटोळे करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यावर महसुली तुटीचा बोजा वाढत आहे. लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे महाराष्ट्र महसुली तुटीत गेला. तसेच महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर नकारात्मक परिणाम झाल्याचेही २९ जानेवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार झालेल्या निरीक्षणात नोंदविण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या लोकानुनयी योजना आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे राज्य सरकारच्या जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने त्याचा फटका चालू आर्थिक वर्षातील तरतुदींना बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे निर्णय होतात आणि निवडणूक जिंकल्या जातात. यावेळी निवडणूक आयोग काय करते, असा सवालही त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली पाहिजे पण ते कठोर भूमिका घेऊ शकत नाहीत. ते सरकारच्या हातामधील खेळणे झाले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असायला हवा. उपमुख्यमंत्री पद हे देखील घटनात्मक पद नाही. ते दोन नेमले जातात. पण घटनेत तरतूद असलेले विरोधी पक्षनेता हे पद रिकामे ठेवता यावर संशोधन करण्याची गरज काय, असा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.