Thalapathy Vijay : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून अभिनेता ते राजकारणी बनलेले थलपती विजय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या Tamilaga Vettri Kazhagam (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत सर्वाधिक 108 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात सत्तास्थापनेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता मात्र काँग्रेससह डाव्या पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने विजय यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. Thalapathy Vijay तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागांमध्ये बहुमतासाठी 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. TVK ने सर्वाधिक 108 जागा जिंकल्या असल्या तरी हा आकडा बहुमतापासून दूर होता. त्यानंतर काँग्रेसने आपल्या पाच आमदारांसह TVK ला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे दोन्ही पक्षांचे एकत्रित संख्याबळ 113 वर पोहोचले. मात्र विजय यांनी दोन मतदारसंघातून विजय मिळवल्याने प्रत्यक्षात TVK चे संख्याबळ 107 मानले जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेससह आघाडीची एकूण ताकद 112 वर स्थिरावली होती. त्यामुळे बहुमतासाठी आणखी सहा आमदारांची गरज होती. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM) आणि विदुथलाई चिरुथैगल काची (VCK) या पक्षांनी TVK ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या तिन्ही पक्षांकडे मिळून सहा आमदार आहेत. त्यामुळे TVK आघाडीचा आकडा थेट 118 वर पोहोचला असून सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत पूर्ण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी सायंकाळी 4.30 वाजता भेटीची वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र राज्यपाल कार्यालयाकडून अद्याप अधिकृत वेळ देण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर विजय यांची राज्यपालांसोबतची ही तिसरी संभाव्य भेट असणार आहे. तमिळनाडूमध्ये यावेळी तरुण मतदारांनी मोठ्या प्रमाणात TVK ला पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. चित्रपटसृष्टीतून आलेल्या विजय यांनी प्रचारादरम्यान भ्रष्टाचार, रोजगार, शिक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांवर जोरदार भूमिका घेतली होती. त्यामुळे पहिल्याच मोठ्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी CPI चे सरचिटणीस D. Raja यांच्याशी चर्चा करून तमिळनाडूमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी TVK ला पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे आता तमिळनाडूमध्ये विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या विजय यांना आता राजकीय क्षेत्रातही मोठा पाठिंबा मिळताना दिसत असून, ते तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री होणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.