– राहुल गोखले तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी असला तरी तेथील राजकारण आतापासूनच तापू लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तेथील मुख्यतः द्रमुक व अण्णा द्रमुक या दुहेरी लढतीत अभिनेता ‘विजय’ यांच्या टीव्हीके पक्षाचा झालेला प्रवेश. तामिळनाडूत विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला यशाची पूर्ण खात्री आहे; इतकी की पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बारा ठराव संमत करण्यात आलेच; पण मुख्य म्हणजे विजय यांना पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यात आले. विजय यांनी सर्वच प्रमुख पक्षांपासून अंतर राखले असले तरी मध्यंतरी अण्णा द्रमुक व टीव्हीके पक्षातील संभाव्य युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. आता विजय हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित झाल्याने तामिळनाडूच्या राजकारणात रंजक वळण आले आहे. भाजपशी युती करायची किंवा नाही यावरही अण्णा द्रमुकची ठाम भूमिका नाही; कारण त्या युतीने यशाची हमी मिळालेली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुक-भाजप एकत्रितपणे लढले; परंतु त्या आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. 2022च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे दोन पक्ष एकत्रितपणे लढले पण अण्णा द्रमुकच्या वाट्याला अपयश आले आणि सत्ता द्रमुककडे गेली. याचा परिणाम असा झाला की गेल्या वर्षी झालेल्या (2024) लोकसभा निवडणुकीत या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली तेव्हा दोन्ही पक्षांची कामगिरी सुमार राहिली. सरलेल्या एप्रिल महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अचानक 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व अण्णा द्रमुक यांची युती असेल असे जाहीर केले. ते आश्चर्यचकित करणारे असले तरी भाजपला अण्णा द्रमुकची गरज असल्याचे ते द्योतक होते. मात्र एकत्र लढून देखील यशाची खात्री अण्णा द्रमुकला नसावी. याचे मुख्य कारण म्हणजे विजय यांचा राजकारणात झालेला प्रवेश आणि त्यांनी द्रमुकविरोधी अवकाश व्यापण्याची रचलेली व्यूहरचना. तो अवकाश व्यापणे याचाच अर्थ अण्णा द्रमुकच्या जनाधाराचा संकोच होणे. अशाने अण्णा द्रमुकसमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच टीव्हीके पक्षाशी सलगी करण्याचे सूतोवाच पलानीस्वामी यांनी केले. नव्या पक्षाची घोषणा 2024च्या फेब्रुवारी महिन्यात केल्यापासून विजय यांनी भाजप हा आपला वैचारिक विरोधक तर द्रमुक हा राजकीय विरोधक असल्याचे वारंवार सांगितले होते. यात त्यांनी अण्णा द्रमुकला लक्ष्य करणे टाळले होते. तथापि काही दिवसांपूर्वी त्यांनी अण्णा द्रमुकवर टीकेचे वाग्बाण सोडले. भाजपशी अण्णा द्रमुकने आघाडी करणे म्हणजे एमजीआर व जयललिता यांच्या तत्त्वांशी प्रतारणा आहे आणि ती आघाडी संधिसाधू असल्याचा घणाघात विजय यांनी केला. तेव्हाच विजय यांचा मनोदय हा अण्णा द्रमुकची मतपेढी आपल्याकडे वळविण्याचा असल्याचे स्पष्ट झाले होते. या संकेताची नोंद घेऊन अण्णा द्रमुकने टीव्हीके पक्षाबद्दलचा आपला पवित्रा बदलला. 27 सप्टेंबर रोजी विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी होऊन चाळीस नागरिकांचा बळी गेला. पोलिसांना सभेसाठी परवानगी मागताना दहा हजार जणांची उपस्थिती असेल असे नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात तीस हजार जणांचा जमाव तेथे होता. त्यातूनच दुर्घटना घडली. त्यावेळी द्रमुककडून विजय यांना लक्ष्य केले जात असताना अण्णा द्रमुकच नव्हे तर भाजपने देखील आश्चर्यकारकरित्या विजय यांच्याविषयी नरमाईची भूमिका घेतली. वास्तविक या दोन्ही पक्षांशी आघाडी नाही ही विजय यांची भूमिका असताना त्यांच्याबद्दल टीकेचा एक शब्द न काढणे भाजप व अण्णा द्रमुकने पसंत करावे हे पुरेसे बोलके. अण्णा द्रमुकच्या याच आतुरतेला पुष्टी देणारी घटना पलानीस्वामी यांच्या सभेत घडली. तेथे एका श्रोत्याने टीव्हीके पक्षाचा झेंडा हातात धरून फडकावला. तेव्हा पलानीस्वामी यांनी एका आघडीची ही प्रतीकात्मक सुरुवात आहे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. द्रमुकला आव्हान देण्याची विजय यांची क्षमता असल्याची ही एका अर्थाने कबुलीच. असे म्हटले जाते की विजय व पलानीस्वामी यांच्यात मध्यंतरी संभाव्य आघाडीची चर्चा झाली होती. परंतु विजय यांनी केलेल्या मागण्या अण्णा द्रमुकला अवास्तव वाटल्या व चर्चा पुढे सरकली नाही. विजय यांची मागणी अर्थातच मुख्यमंत्रिपदाची होती व आहेच; पण जागावाटपात शंभरेक जागांची त्यांची मागणी आहे. अण्णा द्रमुकने साठ जागा देण्याची व मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती देण्याची तयारी दर्शविली असली तर विजय यांनी आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. भाजपवर विजय यांनी कितीही टीका केली असली तरी भाजप व अण्णा द्रमुकबरोबर आघाडी विजय करणारच नाहीत असे नाही. केवळ तशी ती आघाडी झालीच तर आपल्या नव्या पक्षाच्या वाट्याला सन्मानजनक वाटतील इतक्या जागा याव्यात अशी त्यांची अपेक्षा असणार. आपल्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यामागे दबावतंत्राचे प्रयोजन असावे हेही नाकारता येत नाही. याच दबावतंत्राचा भाग म्हणून टीव्हीके पक्षाने संमत केलेल्या ठरावांमध्ये तामिळनाडूतील मच्छिमारांना श्रीलंका नौदलाकडून होत असणार्या अटकेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला व त्यासाठी केंद्रातील भाजप सरकारच्या उदासीनतेला जबाबदार धरण्यात आले. तामिळनाडूत होत असलेल्या सखोल मतदार सर्वेक्षण (एसआयआर) मोहिमेस विरोध करणारा ठराव संमत करण्यात आला जेणेकरून द्रमुकच्या शिडातील हवा काढून घेता यावी. विजय यांची लोकप्रियता अफाट असली तरी निवडणूक जिंकण्यासाठी केवळ तेवढेच क्वचितच फलदायी ठरते. तत्कालीन आंध्र प्रदेशात एन टी रामाराव यांनी 1980च्या दशकात पदार्पणातच ती किमया करून दाखविली होती. पण तसे अपवाद वगळता नेतृत्वाबरोबरच संघटन; व्यूहरचना आखण्याचा अनुभव आवश्यक असतो. विजय यांचा चेहरा विशेषतः तरुणांना आकृष्ट करण्याच्या दृष्टीने लाभदायी आहे हे खरे; पण अण्णा द्रमुक व भाजपकडे संघटन आहे; कार्यकर्ते आहेत. अण्णा द्रमुकडे लोकप्रिय चेहरा नाही आणि भाजपला तामिळनाडूच्या राजकारणात फारसे स्थानच नाही. तेव्हा द्रमुकला आव्हान द्यायचे तर चेहरा, संघटन व कार्यकर्ते यांचा मिलाफ होणे आवश्यक. कदाचित याची जाणीव अण्णा द्रमुकला झाली असावी. अण्णा द्रमुकचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून काही विजय यांनी नव्या पक्षाची स्थापना केलेली नाही. तेव्हा टीव्हीके पक्षाशी आघाडी झाली तर निदान अडीच वर्षे तरी विजय यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन पलानीस्वामी यांना द्यावे लागेल. आघाडी करण्यासाठी भाजपशी युती तोडावी लागेल अशी पूर्वअट विजय यांनी घातली तर प्रसंगी अण्णा द्रमुक भाजपपेक्षा विजय यांना प्राधान्य देईल यात शंका नाही. भाजपशी आघाडी ही तशीही अण्णा द्रमुकची निकड नाही; त्या आघाडीची गरज भाजपला जास्त आहे. तामिळनाडूत तूर्तास असे मानले जात आहे की टीव्हीके पक्षाबरोबर जे जातील त्यांचा विधानसभा निवडणुकीत ‘विजय’ निश्चित आहे. द्रमुकबरोबर टीव्हीके पक्षाने आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण लढतच त्या पक्षाशी असणार आहे. काँग्रेसनेही टीव्हीके पक्षाशी आघाडीसाठी उत्सुकता दाखविली होती असे म्हणतात. मात्र त्यासाठी काँग्रेसला द्रमुकशी आघाडी तोडावी लागेल. अण्णा द्रमुक व भाजप यांना दोन्ही पक्षांना टीव्हीके पक्षाशी आघाडी खुणावत आहे. हे सर्व पक्ष जुने व मोठे असूनही त्यांना नवख्या टीव्हीके पक्षाची भुरळ पडली आहे. त्यासाठी प्रसंगी आपल्या पारंपरिक मित्रपक्षांशी युती तोडूनही टीव्हीके पक्षाशी आघाडी करण्याची या पक्षांची मानसिकता आहे. टीव्हीके पक्षाने आपली इतकी उपयुक्तता अवश्य सिद्ध केली आहे ज्यामुळे सर्वच पक्षांना ‘विजय’ हवासा वाटतो आहे. लवचिकता दाखवून विजय स्वतः व आपला पक्ष तामिळनाडूच्या राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी या संधीचा कसा फायदा घेतात हे पाहणे औत्सुक्याचे.