चेन्नई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘नॅशनल क्रश’ आणि अभिनयाचा ‘लिजेंड’ मानला जाणारा अभिनेता विजय सेतुपती सध्या त्याच्या आगामी प्रकल्पांमुळे चांगलाच चर्चेत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ मध्ये विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. आता खुद्द विजय सेतुपतीनेच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या करिअरमधील भूमिकांविषयी बोलताना विजय सेतुपती म्हणाला की, तो आता सरसकट कोणत्याही खलनायकाच्या भूमिका स्वीकारणार नाही. त्याने स्पष्ट केले की, “जर स्क्रिप्टमध्ये काहीतरी वेगळे आणि आव्हानात्मक असेल, तरच मी व्हिलनची भूमिका साकारीन. सध्या मला ऑफर होणाऱ्या बहुतेक खलनायकाच्या भूमिका या केवळ ‘हिरो’चे मोठेपण दाखवण्यासाठी लिहिल्या जातात. अशा साचेबद्ध भूमिका करण्यात मला रस नाही. म्हणूनच मी अशा कामांना नकार दिला आहे.” असं विजय म्हणाला आहे. ‘जेलर २’ स्टारकास्ट आणि रिलीज डेट : नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर २’ हा २०२३ च्या सुपरहिट ‘जेलर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रजनीकांत, विद्या बालन, मिथुन चक्रवर्ती, एस. जे. सूर्या, राम्या कृष्णन आणि योगी बाबू. तसेच मोहनलाल, शिव राजकुमार आणि विनायकन या कलाकारांचा कॅमिओ अपिअरन्स देखील असणार आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जर तुम्ही या सिनेमाचा पहिला भाग पाहिला नसेल किंवा विसरला असाल, तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ‘जेलर’ (२०२३) मध्ये रजनीकांत यांनी ‘मुथुवेल पांडियन’ नावाच्या एका निवृत्त जेलरची भूमिका साकारली होती. आपला मुलगा (जो एक पोलीस अधिकारी असतो) याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा निवृत्त जेलर गुन्हेगारी जगाशी कसा भिडतो, अशी ही कथा होती. या चित्रपटाने जगभरात ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तमिळ सिनेसृष्टीतील हा सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.