Vijay Deverakonda: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दमदार अभिनय, हटके स्टाइल आणि भन्नाट अॅटिट्यूडमुळे विजयने कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली. आज तो केवळ साऊथ इंडस्ट्रीतच नाही, तर संपूर्ण देशभरात ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखला जातो. (Vijay Deverakonda) विजय देवरकोंडाचा प्रवास मात्र सोपा नव्हता. २०११ मध्ये आलेल्या ‘नुव्विला’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला त्याला छोट्या भूमिका मिळत होत्या. ‘लाईफ इज ब्युटीफुल’ या चित्रपटातही तो छोट्या भूमिकेत दिसला होता. मात्र, अभिनयाची आवड आणि मेहनतीच्या जोरावर त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. २०१५ मध्ये आलेल्या ‘येवाडे सुब्रमण्यम’ या चित्रपटामुळे विजयकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. २०१६ मध्ये आलेला ‘पेल्ली चूपुलू’ हा त्याच्या करिअरमधील पहिला मोठा हिट चित्रपट ठरला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. विजयच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. (Vijay Deverakonda) Vijay Deverakonda मात्र, २०१७ मध्ये आलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने विजयचे आयुष्यच बदलून टाकले. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या या चित्रपटात विजयने साकारलेली गंभीर आणि बंडखोर भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या चित्रपटानंतर विजय रातोरात सुपरस्टार बनला. त्याच्या स्टाइल, संवादफेक आणि अभिनयाने तरुणांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली. (Vijay Deverakonda) यानंतर विजयने अनेक यशस्वी चित्रपट दिले. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गीता गोविंदम’ हा त्याच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी लोकप्रिय झाली की, त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगू लागल्या. आज विजय देवरकोंडाची फॅन फॉलोइंग केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहतात. साधेपणा, आत्मविश्वास आणि हटके व्यक्तिमत्त्वामुळे विजय तरुणांचा आवडता अभिनेता बनला आहे. सध्या विजयच्या आगामी चित्रपटांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.