बरमती (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशनस ऑन इनोव्हेशन अचीवमेंटच्या देशपातळीवरील मानांकनामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने पहिल्या 25 मध्ये मानांकन पटकावून उत्तुंग झेप घेतली आहे.
उपलब्ध साधन सुविधा, उद्योजकतेतील नाविन्यपूर्ण कल्पना, अभिनव संकल्पनांची जनजागृती, उद्योजकतेसाठी उद्युक्त करणे, परिपक्व कल्पनांचे व्यवसायीकरण, बौद्धिक संपदा हक्क, आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, अभिनव अध्यापन पद्धत, व्यवस्थापनातील कल्पकता इत्यादी निकषावर आधारित शासकीय व अनुदानित महाविद्यालय गटामध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या निकषांची पूर्तता व्यवस्थापक मंडळ, महाविद्यालयाचे प्रशासन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नामुळेच आमच्या महाविद्यालयास केंद्र सरकारच्या अटल मानांकन प्रक्रियेत हे घवघवीत यश संपादन करता आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.
कौशल्याधारित शिक्षण पद्धती विकसित करून त्याचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना फायदा होऊन देशाचे मनुष्यबळ विकसित व्हावे आणि देशातील विविध नामांकित संस्थामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची निकोप स्पर्धा व्हावी यासाठी देशात शिक्षण मंत्रालयाने ही अटल रँकिंग योजना सुरू केली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोध निबंध निबंधाचे सादरीकरण, प्रकाशन, शिष्यवृत्ती, विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संशोधन प्रकल्प, स्टार कॉलेज, बी व्होक, या उपक्रमासाठी आर्थिक सहाय्यता निधी मिळाला आहे. शिवाय महाविद्यालयात नियमित अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यास पूरक व अभ्यासोत्तर उपक्रमांची रेलचेल असते.