‘प्राईम टाईम’ला पावसाची हजेरी : कोपरा सभा, पदयात्रांचा खोळंबा
पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. अशातच परतीच्या पावसाने झोडपण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. अगोदरच प्रचारासाठी मिळालेल्या कमी कालावधीत पावसाने जोर धरल्याने नेत्यांना मतदारापर्यंत पोहचणे मुश्किल झाले आहे. कोपरा सभा, पदयात्रांना कार्यकर्ते जमवता जमवता नेत्यांची दमछाक होत आहे. सायंकाळच्या सुमारास प्रचाराच्या “प्राईम टाईम’ ला हजेरी लावणाऱ्या पावसामुळे प्रचाराच्या तोफा गार केल्याचे पहायला मिळत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 7 तारखेला संपली आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर लढती स्पष्ट झाल्या. त्यामुळे आता प्रचाराला गती आली आहे. पदयात्रा, गाठी-भेटी तर कोपरा सभांमुळे नेत्यांचे शेल बिझी झाले आहे. दिवसाचे नियोजनही ठरले आहे. त्यामुळे प्रचार करत असताना नेत्यांना वेळ कमी पडत आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा नेते प्रयत्न करीत आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर प्रचार सभांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत त्यांची तयारीही जोरदार चालू असताना दिसत आहे.
प्रचार शिगेला पोहोचत चालला असताना दररोज सायंकाळी हजेरी लावून रात्री उशिरापर्यंत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने नेत्यांची डोकेदुखी वाढविली आहे. प्रचाराला सुरुवात झाली असल्याने पावसातच प्रचार करताना नेत्यांची तारांबळ उडत आहे. अचानक मुसळधार पडणाऱ्या पावसाने नेत्यांच्या प्रचारसभाच उधळून लावल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी “रोड शो’ झाला. परंतु, पावसाने त्यात व्यत्यय आणल्याने “रोड शो’ उरकता घेण्यात आला.
निवडणूक आयोगाने रात्री दहा वाजेपर्यंतच प्रचार सभांची परवानगी दिली आहे. सकाळच्या पदयात्रेने नेत्यांच्या प्रचाराची सुरुवात होत आहे तर दुपारी गाठी-भेटींचा कार्यक्रम रंगत आहे. मात्र, पावसाचा सायंकाळच्या प्रचारात व्यत्यय येत आहे. सायंकाळनंतर विजांच्या कडकडटासह वादळी पावसाला सुरुवात होत आहे. हीच परिस्थिती रोजच असल्याने नेत्यांच्या प्रचाराची गती कमी होत चालली असून प्रचारसभांचे नियोजन कोलमडले आहे. लोकही पावसामुळे घराबाहेर पडायला तयार नाहीत त्यामुळे प्रचार सभा, कोपरा सभांसाठी गर्दी गोळा करताना कार्यकर्त्यांना घाम फुटत आहे. दबक्या आवाजात कोणाच्या तरी घरात गाठी-भेटींच्या कार्यक्रमांवरच नेत्यांना समाधान मानावे लागत आहे. प्रचाराचे नियोजन रोजच विस्कळीत होत असल्याने नेत्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
सोशल मीडियावरच भिस्त –
जाहीर प्रचारासाठी आता अवघा सात दिवसांचा कालावधी उरला आहे. पाऊस प्रचाराचे नियोजन बिघडवित असल्याने सर्वच उमेदवारांनी सोशल मीडियावर जोर दिला आहे. स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी लावण्यात आली आहे. प्रचार गीत, उमेदवारांवरील “डॉक्युमेंटरी क्लिप’चा भडीमार सोशल मीडियावर सुरू आहे. ऑडिओ, व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून फेसबूक, व्हॉटस्ऍपवर उमेदवार आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.