माजी महापौर हुनमंत भोसले यांनी व्यक्त केला विश्वास
पिंपरी – माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच या मतदारसंघाने विकासाची कास धरली. कोणी काहीही म्हणत असले तरी “गुरू हा गुरू’ असतो. विलास लांडे या गुरूने दहा वर्षात केलेला विकास त्यांच्या शिष्याला समजलाच नाही. गेल्या पाच वर्षांत हा मतदारसंघ वेगळ्याच मार्गाने निघाला आहे. हा मार्ग मतदारसंघाच्या हिताचा नाही. या मतदारसंघाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या वातावरणात वावरता यावे यासाठी विलास लांडे हे आमदार होणे गरजेचे आहे. त्यामुळे नेहरूनगर आणि मासुळकर कॉलनीतील सर्व जनता अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करणार, असा निर्धार माजी महापौर हनुमंत भोसले यांनी रविवारी (दि. 13) व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी प्रचारासाठी रविवारी नेहरूनगर आणि मासुळकर कॉलनी परिसरात पदयात्रा काढली. राष्ट्रवादीचे नगरसेवक समीर मासुळकर यांच्या मासुळकर कॉलनी येथील निवासस्थानापासून या पदयात्रेला सुरूवात झाली. नगरसेवक मासुळकर यांच्या घरातील महिलांनी लांडे यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रिलायन्स बिल्डिंग, आर सेक्टर, डब्ल्यू सेक्टर, वास्तु उद्योग कॉलनी, नवनिर्माण मंडळ, उद्यमनगर, अंतरिक्ष कॉलनी, स्वप्ननगरी, यशवंतनगर झोपडपट्टी त्यानंतर नेहरूनगर, नूर मोहल्ला, 786 चाळ, वसंतदादा पाटील शाळा परिसर, क्रांती चौक, दोस्ती बेकरी, आंबेडकरनगर, शांती विहार, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प येथे पदयात्रेचा समारोप झाला.
पदयात्रेदरम्यान लहान मुले उत्साहाने त्यात सहभागी झाली. या मुलांनी माजी आमदार विलास लांडे यांच्यासोबत सेल्फी घेत पदयात्रेत उत्साह निर्माण केला. विलास लांडे यांनी नागरिक, व्यापारी आणि महिलांशी संवाद साधला. आमदार म्हणून भोसरी मतदारसंघात मोठे प्रकल्प आणले. नेहरूनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प माझ्या आमदारपदाच्या कालावधीतच मार्गी लागला. त्यामुळे या भागातील गोरगरीब झोपडीधारकांना पक्की घरे उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे भोसरी मतदारसंघातही अनेक मोठे प्रकल्प राबविले.
मतदारसंघात उभे राहिलेल्या प्रकल्पांकडे गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. तसेच काही प्रकल्पांना खोडा घातला गेला आहे. मतदारसंघात चुकीच्या प्रवृत्ती वाढल्या आहेत. न केलेली कामे सुद्धा केल्याचे सांगून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या खोट्या प्रचाराला बळी न पडता निवडणुकीत कपबशी चिन्हासमोरील बटन दाबून चांगल्या विचाराला विजयी करावे, असे आवाहन विलास लांडे यांनी नागरिकांना केले.
यावेळी बोलताना माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले, विलास लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार होते. त्यांच्याच कार्यकाळात नेहरूनगरसारख्या बहुभाषिक प्रभागात केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प साकरले गेले. या प्रकल्पामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना हक्काचे कायमचे छत मिळाले. भोसरी मतदारसंघात जे काही मोठे प्रकल्प झाले, त्यामागे विलास लांडे यांचा पाठपुरावा निश्चित आहे. त्यांनी मतदारसंघासाठी अनेक विकासकामे केली. मतदारसंघातील रस्त्यांचा विकास त्यांनी केला. मात्र आता भोसरी मतदारसंघात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून वाटेल तसे निर्णय घेतले जात आहेत. त्यातून जनतेचा विकास साधण्याऐवजी स्वतःचा आधी विकास कसा होईल, हे पाहिले जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक प्रकल्पांना खोडा बसला आहे. प्रत्येक प्रकल्पाला वाढीव खर्च देऊन कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे. मतदारसंघात चुकीच्या प्रवृत्तींना बळ मिळाले आहे. त्याला आळा घालण्याची हिंमत केवळ विलास लांडे यांच्यामध्येच आहे. नेहरूनगर आणि मासुळकर कॉलनी प्रभागातील सर्व जनता विलास लांडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. ही जनता निवडणुकीत कपबशी चिन्हाला पसंती देणारी असून, विलास लांडे यांना भरघोस मतांनी विजयी करणार असल्याचा निर्धार हनुमंत भोसले यांनी केला.
या पदयात्रेत माजी महापौर व राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, नगरसेविका गीता मंचरकर, अमित भोसले, सतीश भोसले, राम मासुळकर, मधुकर मासुळकर, ऋषिकेश भोसले, अमजद इनामदार आदी सहभागी झाले होते.