Maharashtra Election : हॉटेलचा ‘तो’ ड्रामा भोवला! ठाकूर पिता-पुत्रांचा पराभव

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या या निकालात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे, यात बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर या पिता-पुत्रांचा देखील समावेश आहे.
नालासोपारा मतदारसंघातून भाजपचे राजन नाईक यांचा विजय झाला आहे तर वसईतून स्नेहा दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांना धूळ चारली आहे. या विजयानंतर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विजयी उमेदवार राजन नाईक यांचं फोनकरून अभिनंदन केलं आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये राडा
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी नालासोपाऱ्याच्या हॉटेलमध्ये मोठा राडा झाला होता. भाजप नेते विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिकडे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि क्षीतिज ठाकूर शिरले आणि त्यांनी तावडेंवर पैसे वाटल्याचे आरोप केले. विनोद तावडेंनी वाटण्यासाठी 5 कोटी रुपये आणल्याचा आरोप क्षीतिज ठाकूर यांनी केला. यानंतर हॉटेलमध्ये जोरदार हंगामा झाला होता.





