विधानसभा निवडणुकीत माकप दिंडोरीसह ‘या’ 12 जागा लढवणार ; महाविकास आघाडीकडे मागणी

Vidhan Sabha Election । राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत अजून तरी जागावाटप निश्चित झालं नाही. त्यातच आता माकप पक्षाकडून राज्यातील 12 जागा लढवण्याचा निर्धार करण्यात आलाय.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने शहरातील पक्ष सभासदांची सर्वसाधारण सभा सीटू कामगार भवन याठिकाणी पक्षाचे राज्य सेक्रेटरी उदय नारकर, जीवा पांडू गावित, भिका राठोड, डॉ. डी. एल. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका? याविषयी कॉ. उदय नारकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात कॉ जे पी गावित यांनी मार्गदर्शन केले.
माकप महाविकास आघाडीसोबतच Vidhan Sabha Election ।
यावेळी विधानसभेसाठी निवडणूकीत नाशिक पश्चिममधून डॉ.डी.एल.कराड यांनी निवडणुकीच्या नियोजनास अंतिम रूपरेषेचे माध्यमातून समारोप केला. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत माकपच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडलेली असून, लोकसभेप्रमाणेच आगामी विधान सभेच्या निवडणूकीतही माकप महाविकास आघाडीसोबत काम करणार असल्याची ग्वाही देण्यात आली.
राज्यातील 12 जागा लढवण्याचा निर्धार Vidhan Sabha Election ।
निवडणूकीत माकपाचे प्राबल्य असलेल्या राज्यातील 12 जागा लढवण्याचा निर्धार माकपाने या बैठकीत व्यक्त केला असून त्यास शरद पवार, उध्दव ठाकरे व नाना पटोले यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याचे माकपाचे प्रदेश सेक्रेटरी कॉ. उदय नारकर यांनी यावेळी सांगितले.
माकपाचे प्राबल्य असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण व नाशिक पश्चिम या जागांची मागणी करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या सरकारने जनसामान्यांना देऊ केलेल्या योजना हा निवडणूक स्टंट असून त्या योजना दिर्घकाळ चालू शकणार नाहीत. सरकारचा सुरु असलेला कारभार हा राज्याच्या हिताचा नाही. त्यामुळे लोकसभेप्रमारेच सत्ताधार्यांना जनता मोठा झटका देणार असून या विरोधात मविआची वज्रमुठ एक दिलाने काम करणार असल्याचे डॉ. डी.एल. कराड यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक पश्चिम मतदारसंघावर या आधीच शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यामुळे नाशिक पश्चिमची जागा नक्की कुणाला सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





