Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार; भाजपकडून इच्छुकांकडून फिल्डिंग सुरू
Vidhan Parishad Election 2026 : विधीमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यात आला.

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात 13 मे 2026 रोजी संपणार आहे. यानंतर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. यासाठी आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भाजपचे चार आमदार सध्या निवृत्त होत आहेत. रणजीतसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या आमदारांचा यात समावेश आहे. यातील काहींना पुन्हा संधी दिली जाणार का हे पहावे लागेल.
इच्छुकांकडून ‘फिल्डिंग’ सुरू
सध्या भाजपकडून केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही नेते परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार आता इच्छुकांकडून विधान परिषदेसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40) असल्याने महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांचा केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल.
विधान परिषदेतून निवृत्त होणारे 9 सदस्य ?
भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी, दादाराव केचे, उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना शिंदे गट), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शप), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश राठोड हे सदस्य विधान परिषदेतून निवृत्त होणार आहेत.
दरम्यान, विधीमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी चर्चेत राहिली होती.
हेही वाचा :






