Delhi Election Results 2025: भाजपने दिल्लीतील आम आदमी पार्टी (AAP) ला सत्तेतून बाहेर काढले आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपला दिल्लीत पूर्ण बहुमत मिळाले आहे. भाजपच्या विजयाच्या आणि केजरीवालांच्या पराभवाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
नवी दिल्ली जागेवर, आप प्रमुख केजरीवाल यांचा भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी 4089 मतांच्या फरकाने पराभव केला. केजरीवाल यांच्या पराभवानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल पीएम मोदींना आव्हान देताना दिसत आहेत, विशेष म्हणजे हा व्हिडिओ केजरीवाल यांच्या स्वतःच्या प्रोफाइलवरून शेअर करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींना आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल –
व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींना आव्हान देताना ऐकू येत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये केजरीवाल म्हणतात, ‘मोदी जी, तुम्ही आम्हाला या जन्मात हरवू शकत नाही.’ हा व्हिडिओ 18 नोव्हेंबर 2023 चा आहे. केजरीवाल यांच्या स्वतःच्या प्रोफाइलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दिल्ली निवडणुकीच्या निकालांनी हॅट्ट्रिक करण्याचे ‘आप’चे स्वप्न भंगले. 70 विधानसभेच्या जागा असलेल्या दिल्लीत पूर्ण बहुमतासाठी 36 जागा आवश्यक आहेत. भाजपने हा आकडा पार केला आहे.
27 वर्षांनंतर भाजपचे दिल्लीत पुनरागमन –
भारतीय जनता पक्ष (BJP) 27 वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (NCT-Delhi) मध्ये पुढील सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या वेळी 1993-1998 दरम्यान सत्तेवर आले होते.