#video: जितेंद्र आव्हाड म्हणतात,”माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही”; भाजपने व्हिडीओ पोस्ट करत केली राजीनाम्याची मागणी

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हाड यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाड यांच्या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ भाजपने पोस्ट केला आहे. ‘जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध, माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही, असे आव्हाड म्हणालेत,’ असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध!
‘माझा OBC समाजावर वर फार विश्वास नाही’ – @Awhadspeaks#OBC समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा @NCPspeaks घेणार का?
NCP च्या मनात OBC समाजाबद्दल एवढा राग का? यासाठीच OBC चे राजकीय आरक्षण घालवलं का? pic.twitter.com/9ySJ0dnl85
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 3, 2022
“ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का?”, असा प्रश्नही भाजपाने उपस्थित केला आहे. तसेच “राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल एवढा राग का?, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल का?,” असा प्रश्नही भाजपाने विचारलाय. या ट्विटमध्ये आव्हाड आणि राष्ट्रवादीची अधिकृत ट्विटर हॅण्डल टॅग करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
“ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,” असे आव्हाड या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.
“ओबीसींवरती ब्राम्हण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,” असे आव्हाड म्हणाले आहेत. हा व्हिडीओ सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





