वाघोली : वाघोलीतील गावठाण भागात पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या ३८ मतदारांची नावे वाघोलीच्या मतदार यादीतून वगळून स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या नागरिकांनी मतदान दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केला नसताना त्यांच्या नावे बनावट अर्ज केला गेला असल्याने वाघोलीतील संबधित मतदारांनी आक्षेप घेऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना मतदार नारायण धनाजी जाधव यांनी सांगितले की, माझे नाव असलेल्या यादी भाग क्रमांक ३१४ च्या बीएलओ यांचा मला फोन आला की तुमची नावे वाघोलीच्या मतदार यादीतून कमी करण्याबाबत तुम्ही अर्ज केला होता का? यावर जाधव यांनी आक्षेप घेऊन कोणताही अर्ज केला नसल्याचे सांगितले. त्याच्यासोबतच वाघोलीच्या या मतदार यादीतून वगळण्याबाबत ३८ जणांची नावे असल्याचे समजले. बीएलओ यांनी संबंधितांची रहिवाशी, ओळखपत्र, आक्षेपाबाबत पुरावा घेतला आहे. जाधव व इतरांनी मतदार यादीतून नाव वगळण्याबाबत कोणताही अर्ज केलेला नाही. तरीसुद्धा पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या, मागील अनेक निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या ३८ लोकांची नावे वगळण्याबाबत कार्यवाही केली जात असल्याने हा गैरप्रकार असून हा अर्ज कोणी केला याची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. मतदार अतुल शिंदे व त्यांच्या कुटुंबियांची नावेही या वगळण्याच्या यादीत असल्याने त्यांनीही या प्रकाराबाबत आक्षेप घेऊन नावे याच ठिकाणी ठेवण्याची मागणी केली आहे. वाघोलीच्या मतदार यादीतून ३८ नावे वगळण्याबाबत त्रयस्थ व्यक्तींनी अर्ज केला असल्याने सदरचा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. हा अर्ज कोणी केला याची प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी भाजपचे रामदास दाभाडे, संदीप सातव यांनी केली आहे. वाघोलीच्या मतदार याद्यांच्या ३१४ क्रमांकाच्या या एका मतदार यादीतील हा प्रकार समोर आला असताना इतरही मतदार यादीत असे प्रकार घडण्याची शक्यता असू शकते त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शिरूर विधानसभेचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता सदरची नावे फॉर्म ८ स्थलांतर करण्याबाबत असून संबंधित व्यक्तींची अधिकृत तक्रार अजून आलेली नाही. याबाबत अधिक माहिती घेऊन कळवू असे सांगितले. वाघोलीच्या गावठाणामध्ये ३१४ क्रमांकाच्या मतदार यादीतील ३८ नागरिकांची नावे वाघोलीच्या मतदार यादीतून वगळून स्थलांतरित करण्याबाबत त्यांनी कोणताही अर्ज केलेला नाही. मात्र बीएलओ यांच्याकडे आलेल्या यादीमध्ये नावे स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये ३८ जणांनीच नावे वगळण्याबाबत १५ ऑक्टोबर रोजी अर्ज केला असल्याचे समोर आले. यामध्ये १० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या तानाजी जाधव यांनी देखील त्यांचे नाव मतदार यादीतून नाव स्थलांतरित करण्याचा अर्ज केल्याचा दिसत आहे. त्यामुळे सदरचा प्रकार आणखीनच गंभीर झाला आहे. जागरूक बीएलओ यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून चौकशी केल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला आहे.