धायरी: खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या धरण चौपाटीवरील सेल्फी पॉईंटची तोडफोड अज्ञात समाजकंटकांनी केली. त्याच्या निषेदार्थ खडकवासला ग्रामस्थ आणि सर्व पक्षातील पदाधिकारी यांनी आज सकाळी 11 वाजता येथील महात्मा गांधी चौकात रस्ता रोको आंदोलन केले.
तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला, तर त्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी पोलिसांकडे मागणी सरपंच सौरभ मते यांनी केली.
पुणे- पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्चून ‘आपलं खडकवासला’ हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता.खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन करण्यात आले होते.
दरम्यान अज्ञात समाजकंटकांविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे हवेली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.