B.R. Kulkarni Passes Away: दौंड येथील निवृत्त स्टेशन सुप्रिंटेंडेंट तथा ट्रॅव्हलिंग इन्स्पेक्टर बाळकृष्ण रामचंद्र कुलकर्णी (बी. आर. कुलकर्णी) यांचे अल्पशा आजाराने १० मे रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ते पुणे येथे वास्तव्यास होते. बी. आर. कुलकर्णी यांनी रेल्वे सेवेत कार्यरत असताना कर्मचारी संघटनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या सोलापूर विभागाचे त्यांनी तब्बल १८ वर्षे सचिव म्हणून काम पाहिले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक व संघटनात्मक कार्य सुरू ठेवले. ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन फेडरेशनच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष तसेच पेन्शनर्स असोसिएशन ऑफ रेल्वेचे राष्ट्रीय उपसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर शेकडो निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची पेन्शनविषयक प्रकरणे मार्गी लावण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. बांधकाम व्यावसायिक तथा वास्तुशोध प्रोजेक्ट्सचे सचिन कुलकर्णी व नितीन कुलकर्णी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.