नवी दिल्ली : लोक लेखा समितीचे अध्यक्ष असणारे कॉंग्रेस नेते के.सी.वेणुगोपाल घटनाबाह्य वर्तणूक करत आहेत. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी ते अस्तित्वात नसलेले मुद्दे उपस्थित करत आहेत, असा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. तसेच, त्याविषयीची तक्रार त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. लोक लेखा समितीने सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना समन्स बजावले आहे. तसे समन्स बजावले जाण्याची शक्यता व्यक्त करणारे वृत्त याआधी प्रसिद्ध झाले. त्याचा आधार घेऊन समितीचे सदस्य असणाऱ्या दुबे यांनी याआधीच म्हणजे महिनाभरापूर्वी बिर्ला यांना पत्र पाठवले. देशाच्या अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्याच्या उद्देशातून वेणुगोपाल कृती करत आहेत. ते पदाचा गैरवापर करत आहेत. राजकीय हेतूने प्रेरित असलेले निर्णय ते घेत आहेत, अशा आरोपांची सरबत्ती त्या पत्रातून करण्यात आली. त्यामुळे लोक लेखा समितीच्या बैठकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. त्या समितीमध्ये सत्ताधारी एनडीएचे बहुमत आहे. साहजिकच, समितीच्या बैठका वादळी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.