काराकास (व्हेनेझुएला) : व्हेनेझुएलामधील अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे विरोधी उमेदवार एडमुंदो गोन्झालेझ यांनी देशाबाहेर पलायन केले असून त्यांनी स्पेनमध्ये राजकीय आश्रय घेतला आहे. व्हेनेझुएलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहीती दिली. जुलै महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत संभाव्य विजयी उमेदवार म्हणून गोन्झालेझ यांच्याकडे बघितले गेले होते. अध्यक्ष निकोलस मादुरो यांना मोठा राजकीय हादरा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र सरकारने त्यांच्याविरोधात अटकेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी देशातून पळून जाण्याचा पर्याय निवडल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. निवडणूक झाल्यापासून गोन्झालेझ कोणालाच दिसले नाहीत. त्यांनी राजधानी काराकसमधील स्पेनच्या दूतावासामध्ये राजकीय आश्रय घेतला असल्याचे व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितले. देशातील राजकीय स्थिती आणि शांतता कायम टिकवण्यासाठी सरकारने गोन्झालेझ यांना सुरक्षितपणे देशाबाहेर जाऊ दिले आहे, असेही त्या म्हणाल्या. गोन्झालेझ किंवा व्हेनेझुएलामधील विरोधकांपैकी कोणीही अद्याप या संदर्भात भाष्य केलेले नाही. विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडोवर बंदी घालण्यात आली तेव्हा गोन्झालेझ या माजी मुत्सद्दी अधिकाऱयाने शेवटच्या क्षणी अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली होती. निवडणुकीत मादुरो यांना विजयी घोषितचत केले गेले होते. पण तरी अंतिम मतमोजणी जाहीर न झाल्यामुळे या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत होता.