Venezuela Gunfire। व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमधील राष्ट्रपती भवन मिराफ्लोरेस पॅलेस परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. स्थानिक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलांनी गोळीबार केला. सरकारी अधिकाऱ्यांनी परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचा दावा केला असला तरी, राजधानीत तणावपूर्ण वातावरण कायम आहे. स्थानिक एएफपी वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी संध्याकाळी मिराफ्लोरेस पॅलेसवर अज्ञात ड्रोन उडताना दिसले. राष्ट्रपती राजवाड्याच्या संरक्षणासाठी तैनात सुरक्षा दलांनी ताबडतोब हवेत गोळीबार सुरू केला. सुरक्षा संस्थांना भीती होती की ड्रोनचा वापर हल्ल्यांसाठी किंवा देखरेखीसाठी केला जाऊ शकतो, म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आली. मादुरोच्या अटकेनंतर राजकीय संकट वाढले Venezuela Gunfire। देश आधीच गंभीर राजकीय संकटाचा सामना करत असताना आता गोळीबार झाला. गोळीबाराच्या काही तास आधी उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक करत न्यूयॉर्कमधील एका संघीय न्यायालयात हजर केले, ज्याठिकणी त्यांच्यावर गंभीर ड्रग्ज तस्करीचे आरोप करण्यात आले आहेत. राजधानी कराकसमध्ये दहशतीचे वातावरण राष्ट्रपती भवनाजवळ गोळीबार झाल्याच्या वृत्तानंतर, कराकसमधील जनतेमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. अनेक भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. सरकारने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. व्हाइट हाऊसचे निवेदन Venezuela Gunfire। व्हाइट हाऊसने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती राजवाड्याजवळ झालेल्या गोळीबाराबद्दल एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या गोळीबारात अमेरिकेचा कोणताही सहभाग नाही. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते व्हेनेझुएलाकडून येणाऱ्या गोळीबाराच्या वृत्तांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. व्हेनेझुएलाच्या प्रशासनाचा असा दावा आहे की,मिराफ्लोरेस भवनावर थेट हल्ला झाला नव्हता. ही कारवाई केवळ सुरक्षेच्या कारणास्तव करण्यात आली. ड्रोनची ओळख आणि त्यामागील हेतू तपासला जात आहे. तथापि, विरोधकांचा असा विश्वास आहे की मादुरोच्या अटकेनंतर, देशात अस्थिरता आणि सत्ता संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.