Venezuela Chinese radars Fail to assume American attack: ‘चीनचा माल कधीही दगा देऊ शकतो’ या म्हणीचा प्रत्यय आता वेनेझुएलाला आला आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने राबवलेल्या ‘ऑपरेशन एब्सोल्यूट रिझॉल्व्ह’ (Operation Absolute Resolve) दरम्यान, वेनेझुएलाने चीनकडून खरेदी केलेली प्रगत रडार यंत्रणा पूर्णपणे निकामी ठरली. यामुळे वेनेझुएलाच्या हवाई दलाला अमेरिकन विमानांची साधी भनकही लागली नाही आणि देशाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. वेनेझुएलाने मोठ्या दिमाखात चीनकडून JYL-1 आणि JY-27A ही रडार यंत्रणा खरेदी केली होती. या रडारला जगात ‘स्टेल्थ हंटर’ (छुप्या विमानांना शोधणारे) म्हणून ओळखले जाते. ही यंत्रणा तैनात केल्यानंतर वेनेझुएलाच्या सैन्याने मोठा जल्लोष केला होता. मात्र, प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी या रडारने अमेरिकन फायटर जेट्सच्या हालचाली टिपण्यात पूर्णपणे अपयश मिळवले. केवळ रडारच नव्हे, तर चीनकडून घेतलेली संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीम या हल्ल्यात सपशेल फेल ठरली. रडार निकामी ठरण्यामागची कारणे – तज्ज्ञांच्या मते, चिनी रडार फेल होण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे असू शकतात. अमेरिकेसारख्या देशांकडे हाय-टेक जॅमिंग तंत्रज्ञान आहे, जे रडार सिग्नलला काही सेकंदात ब्लॉक करू शकते. दुसरे म्हणजे, अनेकदा देश महागडी यंत्रणा खरेदी करतात, मात्र ती चालवण्याचे योग्य प्रशिक्षण सैनिकांकडे नसते. तसेच, वेळेवर सॉफ्टवेअर अपडेट न करणे आणि देखभालीत कमतरता यामुळेही यंत्रणा दगा देते. पाकिस्तानलाही बसला होता असाच फटका – चीनच्या या ‘धोकादायक’ तंत्रज्ञानाचा अनुभव घेणारा वेनेझुएला हा पहिला देश नाही. यापूर्वी पाकिस्तानलाही अशाच नामुष्कीचा सामना करावा लागला होता. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, पाकिस्तानची चिनी बनावटीची HQ-9 आणि LY-80 ही रडार यंत्रणा भारतीय फायटर जेट्स आणि ड्रोनना शोधण्यात अपयशी ठरली होती. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते, तरीही पाकिस्तानच्या चिनी रडारला याची कोणतीही सूचना मिळाली नव्हती. एकूणच, पाकिस्ताननंतर आता वेनेझुएलाच्या उदाहरणामुळे चिनी संरक्षण उपकरणांच्या विश्वासार्हतेवर जागतिक स्तरावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.