वाहन चोरी पथक नावापुरतेच

संदीप घिसे

पिंपरी  – शहरात वाहनचोरीचे गुन्हे खूप वाढले आहे. रोज सरासरी चार तर महिन्याला सुमारे 120 वाहने चोरीला जात आहेत. वाढत्या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्‍तांनी वाहन चोरी विरोधी पथक स्थापन केले. मात्र या पथकाने दोन महिन्यांत केवळ सहा वाहने शोधून काढली आहेत. यामुळे हे पथक फक्‍त नावापुरतेच उरले आहे. पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी वाहन चोरीच्या पाच गुन्ह्यांची नोंद झाल्याने वाहन चोरीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुणे पोलीस आयुक्‍तालयात असताना पिंपरी चिंचवड शहरातील नऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज पाच ते सहा वाहने चोरीस जात होती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाची स्थापना झाल्यानंतर हे प्रमाण कमी झाले. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून वाहन चोरांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहराकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येते. 1 जानेवारी ते 31 जुलै या सात महिन्याच्या (212 दिवसात) कालावधीत शहराच्या विविध भागातून तब्बल 812 वाहने चोरीस गेल्याची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये आहे. म्हणजेच दररोज सरासरी चार वाहने चोरीस जात आहेत. वाहन चोरी विरोधी पथकाने गेल्या 57 दिवसांच्या कालावधीत अवघी सहा वाहने शोधून काढली असून त्यामध्ये पाच दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे.

वाहन चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी 23 जून रोजी वाहन चोरी विरोधी पथक स्थापन केले. या पथकामध्ये एक सहाय्यक निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि सहा कर्मचारी दिले आहेत. वाहनचोरांना पकडणाऱ्या पथकाकडे चांगली वाहने असणे अत्यावश्‍यक आहे. परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे आरोपींचा शोध घेण्यासाठी एकही वाहन या पथकाला दिलेले नाही. या पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी वाहनचोरांचा वाहनाविना कसे पकडावे? हा मोठा प्रश्‍न आहे. पथकाकडे वाहनेच नसल्याने त्यांच्या कामावर मर्यादा येत असल्याचे स्पष्ट आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय

शहरातील विविध भागात पोलीस आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर वाहन चोरांचा तपास करण्यासाठी केला जातो. मात्र महापालिकेचे बहुतांश कॅमेरे बंद आहेत. तसेच जे कॅमेरे सुरू आहेत, त्यावर धूळ साचल्याने आरोपी आणि वाहनाचा क्रमांक व्यवस्थित दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

इतर विभागही सुस्तावलेलेच

शहरात मोठ्या प्रमाणात वाहन चोरी होत असताना शहरातील 15 पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखेचे पाच युनिट, दरोडा विरोधी पथकेही सुस्तावलेलीच दिसून येत आहेत. पोलीस आयुक्‍तालयाच्या स्थापनेनंतर आरोपींवर वचक वाढल्यानंतर गुन्हेगारी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पोलिसांचे सर्वच विभाग सुस्तावलेले असल्याने वाहनचोरांची चंगळ होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.