पुणे | पोलीस आयुक्तलयाच्या दारातूनच वाहन चोरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात नागरिकांची वाहने सुरक्षीत नसताना आता चोरट्यांनी थेट पोलिसांची वाहने चोरी करण्याचे धाडस केले आहे, चोरट्यांनी थेट पोलीस आयुक्तालयासमोरूनच वाहन चोरी केली आहे, त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमधून तीन दुचाकी चोरी झाल्या आहेत.
याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दि. १२ ते दि. १४ या दरम्यान ही वाहन चोरी झाल्याचे समजते. मागील सव्वातीन वर्षांत शहरातून २४ कोटी ६८ लाखांची ५ हजार ८२२ वाहने चोरीला गेली आहेत.यामध्ये दुचाकी, रिक्षा आणि मोटारींचा समावेश आहे.
शहरभर सीसीटीव्हीचे जाळे असूनही, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चोरटेही सापडत नाहीत आणि चोरीची वाहनेही मिळत नाहीत. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही वर्षापासून वाहनचोरी पोलिसांना डोकेदुखी ठरत असताना आता पोलीस आयुक्तालयासमोर पार्क केलेली वाहनांची चोरी करीत चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
वाहनचोरी विरोधी पथके फक्त नावालाच…
या वर्षाच्या सुरुवातीला अवघ्या अडीच महिन्यात तब्बल ४ हजार वाहनांची चोरी झाली, त्यांची किंमत १ कोटी ५१ लाख ८४ हजार रुपयांच्या आसपास आहे. दिवसाला शहरातून सहा ते सात वाहने चोरीला जात आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत.
त्यांची उत्तर, दक्षिणमध्ये विभागणी करून कामांचे वाटप करण्यात आले. पण, या पथकांना वाहनचोरींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आलेले नाही. वाहनचोरी विरोधी पथके ही फक्त नावालाच आहेत की काय असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.





