Vehicle prices: जानेवारीपासून वाहनांच्या किंमतीत होणार वाढ

नवी दिल्ली – कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, जास्त पातळीवर असलेले व्याजदर, चलन बाजारातील अस्थिरता या कारणामुळे प्रवासी वाहन कंपन्यांकडून दरवाढ चालूच आहे. टाटा मोटर्सने सोमवारी जारी केलेल्या माहितीनुसार ही कंपनी आपल्या विविध वाहनांच्या दरात जानेवारी महिन्यापासून तीन टक्के वाढ करणार आहे.
मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, जेएसडब्ल्यू एमजी मोटार, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू या कंपन्यांनी अगोदरच आपल्या वाहनांच्या दरात वाढ केली आहे. दरम्यान किया इंडिया या कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार या कंपनीची वाहने जानेवारी महिन्यापासून दोन टक्क्यापर्यंत महाग होतील. कंपनीचे उपाध्यक्ष हरदीप सिंह ब्रार यांनी सांगितले की, आम्हाला सुटे भीग महागात पडत आहेत.
वाहतुकीचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत वाहनाचा एकूण उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे उच्च तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या आमच्या वाहनांच्या दरात जानेवारीपासून दोन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. एकूण महागाई पाहता आम्ही केलेली दरवाढ मर्यादीत आहे. त्यामुळे याचा आमच्या वाहन विक्रीवर परिणाम होणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

