साठा संपेपर्यंत बीएस-4 वाहन विक्रीची मागितली परवानगी
पुणे – मंदीमुळे ग्राहक वाहनांची खरेदी करीत नाहीत. त्यामुळे कंपन्यांकडून वितरकांनी घेतलेल्या “बीएस 4′ वाहनांची वाहने शो रूम किंवा गोडाऊनमध्ये पडून आहेत. 1 एप्रिलपासून बीएस-4 उत्सर्जन मानदंडाची वाहने विकता येणार नाहीत. त्यामुळे वितरकांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तरी “बीएस-4′ मानदंडाची वाहने विकू द्यावीत आणि त्यांची नोंदणी करून घ्यावी, अशी इच्छा वितरकांनी व्यक्त केली आहे. यासाठी देशभरातील वाहन वितरकांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (एफएडीए) सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे.
दिल्लीमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल 2020 पासून बीएस-4 उत्सर्जन मानदंडाची वाहने विकता येणार नाहीत, असे सांगितले होते. कार कंपन्यांना “बीएस-6′ मानदंडाची वाहने विकसित करण्यास सांगितले होते. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये तयार करण्यात आलेली वाहने विकली गेली नाहीत. यामुळे वितरकांचे त्याचबरोबर कंपन्यांचे नुकसान होणार आहे. तयार वाहने विकली जाईपर्यंत
सर्वोच्च न्यायालयाने जुन्या वाहनांच्या विक्रीसाठी परवानगी द्यावी, असे “एफएडीए’ने याचीकेत म्हटले आहे. मार्च 2020 पर्यंत कंपन्यांकडून वितरकांकडे जी वाहने आली आहेत ती विकू द्यावीत, त्यानंतर बीएस-6 मानदंडाची वाहने विकली जातील असे “एफएडीए’ने न्यायालयाला सूचविले आहे. न्यायालयाने आदेश जारी केल्यानंतर कंपन्यांनी जुन्या वाहनांचे उत्पादन कमी केले आहे. त्याचबरोबर जुन्या वाहनांच्या विक्रीवर सूट देण्यात येत आहेत. तरीही मंदीमुळे ग्राहक वाहन खरेदी करण्यास पुढे येत नाहीत. बऱ्याच कंपन्यांनी आता बीएस-6 मानदंडाची वाहने तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
कार कंपन्यांनी यासाठीची तयारी बरीच केली असली तरी व्यावसायिक वाहन निर्मात्यांसाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित वाहन निर्मिती करणे अवघड झाले आहे.
बराच प्रयत्न करूनही गेल्या काही महिन्यांपासून वाहन विक्री थंडावली आहे. जर ही वाहने वितरकांना विकता आली नाही तर त्यांच्यासमोर मोठा आर्थिक पेचप्रसंग निर्माण होणार आहे. त्यामुळे 1 मार्चपर्यंत वितरकांकडे जी वाहने असतील ती विकू द्यावीत, अशी याचिका आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली आहे. आता न्यायालय या याचिकेवर सुनावणी करून आपला आदेश जारी करण्याची अपेक्षा आहे.
– आशिष हर्षराज काळे, अध्यक्ष, “एफएडीए’