वाल्हे : अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे, भाज्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर अनेक भागांत जमिनीतीला वापसा लवकर न आल्याने, पालेभाज्या तसेच इतर तरकारी पिके करण्यास उशीर झाल्यामुळे तसेच मार्गशीर्ष महिन्यांमुळे महिलांचे उपवास असल्याने अनेकजण घरांमध्ये मांसाहार करीत नसल्याने काही दिवसांपासून आठवडे बाजारातील सर्वच वाणांचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेला याची झळ बसत आहे. मात्र, उत्पादक शेतकरी सुखावला आहे. वाल्हे येथील मंगळवार (दि.९) आठवडे बाजारांमध्ये गावरान गवार २०० किलो, शेवगा २०० किलो तसेच जवळपास सर्वच भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले होते. दोन महिन्यपूर्वी झालेला अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडीमुळे आठवडे बाजारात तरकारीची वाण कमी प्रमाणात दाखल होत असल्याने, सर्वच बहुतेक सर्व भाज्या महाग झाल्यामुळे घरातील गृहिणीचे बजेट विस्कळीत झाले आहे. शेवग्याच्या शेंगा, गवार यांचा दर प्रतिकिलो दुप्पटीने वाढला आहे. वाढलेले दर ग्राहक आणि विक्रेत्यांच्याही आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत बाजारात होणारी भाज्यांची आवक कमीच आहे. त्यातच हवेतील गारवा आणि थंडीमुळे भाज्यांची तोडणी कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, आठवडे बाजारात भाजी खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे. गवार, शेवग्याच्या भावात तेजी कशामुळे ? बदलत्या हवामानामुळे, तसेच मागील काही दिवसांत तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीचा परिणाम गवार शेवगा तसेच इतर शेती पिकांच्या उत्पादनावर होत आहे. उत्पादन कमी आणि थंडीच्या दिवसांत वाढत्या मागणीमुळे गवार, शेवग्याच्या दरात तेजी आल्याचे विक्रेते सांगतात. या वाढलेल्या दरामधील गवार, शेवग्याच्या शेंगा खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.