मलकापूर शहरातील भाजी मंडई पूर्ण बंद

पालिका व पोलीस प्रशासनाचा निर्णय; करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना
कराड (प्रतिनिधी) – मलकापूर नगरपालिका क्षेत्रात पुन्हा करोनाने तोंड वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका कार्यक्षेत्रात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय मलकापूर पालिका व पोलीस प्रशासनाने घेतला आहे. शहरात नियमित दोन ठिकाणी भरणाऱ्या भाजी मंडईत विक्रेते आणि ग्राहकांकडून सर्वच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने या दोनही भाजी मंडई पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर पुणे, मुंबईसह बाहेर जिल्ह्यातून पास घेऊन तसेच पास न घेता अनेक नागरिक कराड तालुक्यात दाखल होत आहेत.याचा मोठा फटका कराड व मलकापूर शहरांना बसला आहे. मलकापूरने करोना बाधितांची साखळी तोडली. संपूर्ण मलकापूर करोनामुक्त केले. मात्र, पुन्हा बाहेरून आलेल्या लोकांमुळे मलकापूर शहरात गेल्या सात दिवसांत 15 रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरात लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनामुक्तीनंतर मलकापूर शहरात जखिणवाडी रस्त्याला व झेडपी कॉलनी अशा दोन ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंडईस परवानगी दिली होती. तशी सोशल डिस्टन्सिंगची आखणीही पालिका प्रशासनाने करून दिली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी विक्रेते व ग्राहक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून आले. वृद्धांसह लहान मुलेही व्यावसायिक बनल्याचे निदर्शनास आले. 60 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षांच्या आतील मुलांना करोनाचा धोका आहे. यावर उपाय म्हणून पालिका व पोलीस प्रशासनाने ध्वनीक्षेपकाद्वारे वारंवार सूचनाही दिल्या. तरीही ग्राहक व विक्रेते सर्वच नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे शनिवारी सकाळी पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून तातडीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करत दोनही ठिकाणच्या मंडई बंद केल्या. त्यामुळे येथील मंडई परिसरात शुकशुकाट आहे.
रस्त्यावर बसून भाजी विकण्यास बंदी
मलकापूरमधील मुख्य रस्त्यासह कराड-ढेबेवाडी तसेच जखिणवाडी रस्त्याच्याकडेला बसून विक्रेते भाजीपाला विक्री करत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे सर्रास उल्लंघन होत आहे, हे लक्षात घेऊन रस्त्यावर अथवा फुटपाथवर बसून भाजीपाला विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
भाजी विक्रीसाठी परवानगी आवश्यक
मलकापूर शहरात पुन्हा करोनाने तोंडवर काढले आहे. या पर्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी भाजीमंडई बंद करण्यात आली आहे. अशावेळी नियमांचे पालन होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पालिकेकडून परवाना घेऊन फिरून भाजी पाल्याची विक्री करावी, असे आवाहन पोलीस व पालिकेने केले आहे.





