Boiler Blast : राज्यातील शक्ती जिल्ह्यातील वेदांता पॉवर प्लांट येथे भीषण दुर्घटना घडली आहे. प्लांटमधील बॉयलरचा स्फोट होऊन किमान १० कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून ३० ते ४० कामगार गंभीर जखमी झाले आहेत. (Boiler Blast) मिळालेल्या माहितीनुसार, सिंघितराई येथील या प्लांटमध्ये दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास काम सुरू असताना अचानक बॉयलरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने खर्सिया येथील पद्मावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. काही कामगार अद्यापही अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Boiler Blast) या दुर्घटनेनंतर कामगारांच्या नातेवाईकांनी कारखान्याबाहेर मोठी गर्दी केली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Boiler Blast)