नवी दिल्ली / न्यूयॉर्क : वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल (वय ४९) यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले. स्कीइंगदरम्यान झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमधील माउंट सायनाय रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने (कार्डियाक अरेस्ट) त्यांचे निधन झाले. या दु:खद घटनेमुळे उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावरून मुलाच्या निधनाची माहिती देताना तीव्र दु:ख व्यक्त केले. “आज माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवस आहे. माझा ४९ वर्षांचा मुलगा अग्निवेश आज आमच्यात राहिला नाही. बापाच्या खांद्यावर मुलाची अर्थी जाणे याहून मोठे दु:ख नाही,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, अग्निवेश आपल्या मित्रासोबत अमेरिकेत स्कीइंगसाठी गेला होता. तेथे अपघात झाल्यानंतर तो बरा होत असल्याचे वाटत होते. मात्र अचानक कार्डियाक अरेस्ट झाला आणि आमचा मुलगा आम्हाला सोडून गेला. अनिल अग्रवाल यांनी आपल्या पुत्राच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, ३ जून १९७६ रोजी पटणा येथे मध्यमवर्गीय बिहारी कुटुंबात अग्निवेशचा जन्म झाला. बालपणी तो अत्यंत चंचल, हसतमुख आणि मित्रप्रिय होता. बहिण प्रिया हिच्याबाबत तो कायम संरक्षणात्मक होता. त्याने अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. बॉक्सिंग चॅम्पियन, घोडेस्वारीचा शौकीन आणि उत्तम संगीतकार अशी त्याची ओळख होती. अग्निवेश अग्रवाल यांनी Fujairah Gold ही कंपनी उभारली होती तसेच ते हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे चेअरमन होते. मात्र पद आणि यश असूनही तो अत्यंत साधा, जमिनीवरचा आणि माणुसकी जपणारा होता, असे अनिल अग्रवाल यांनी नमूद केले. पुत्राच्या आठवणीत त्यांनी सांगितले, “अग्निवेश फक्त माझा मुलगा नव्हता, तो माझा मित्र, माझी शान आणि माझे संपूर्ण विश्व होता. माझे आणि किरणचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मात्र वेदांतामध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी मला आज अग्निवेशच वाटतो. देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे आमचे स्वप्न होते.” याचवेळी अनिल अग्रवाल यांनी आपल्या आधीच्या निर्णयाचा पुनरुच्चार करत सांगितले की, आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीपैकी ७५ टक्क्यांहून अधिक रक्कम समाजकार्यासाठी खर्च केली जाईल. “आता मी अधिक साधेपणाने जीवन जगेन आणि उरलेले आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले. कोण आहेत अनिल अग्रवाल? अनिल अग्रवाल यांचा जन्म २४ जानेवारी १९५४ रोजी बिहारमधील पटणा येथे मारवाडी कुटुंबात झाला. मर्यादित साधनसामग्रीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. लहान वयातच उद्योग करण्याची जिद्द आणि शिकण्याची ओढ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होती. कचरा व्यापारापासून ‘मेटल किंग’पर्यंत १९७० च्या दशकात अनिल अग्रवाल यांनी मेटल स्क्रॅप ट्रेडिंगपासून व्यवसायाची सुरुवात केली. १९७६ मध्ये त्यांनी वेदांता लिमिटेडची स्थापना केली. मेहनत, दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांच्या जोरावर वेदांताने झपाट्याने प्रगती केली. याच यशामुळे अनिल अग्रवाल यांना ‘मेटल किंग’ अशी ओळख मिळाली. १९८६ मध्ये त्यांनी स्टरलाइट इंडस्ट्रीजची स्थापना करत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात प्रवेश केला. पुढे BALCO आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडमध्ये नियंत्रणात्मक हिस्सेदारी मिळवून त्यांनी अॅल्युमिनियम आणि झिंक क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले. जागतिक विस्तार २००३ मध्ये लंडनमध्ये Vedanta Resources Limitedची स्थापना करण्यात आली. यानंतर वेदांता लंडन स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होणारी भारतातील आघाडीची नॉन-फेरस मेटल व खाण कंपनी ठरली. अनिल अग्रवाल यांची संपत्ती फोर्ब्सनुसार, २०२६ मध्ये अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती सुमारे ₹३५,००० कोटी इतकी आहे. वेदांता रिसोर्सेस आणि अँग्लो अमेरिकनमधील त्यांच्या हिस्सेदारीतून त्यांना मोठे उत्पन्न मिळते. पुत्राच्या निधनाने वैयक्तिक आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी समाजसेवा आणि राष्ट्रउभारणीचे स्वप्न पुढे नेण्याचा निर्धार अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.