कराड / रेठरे बुद्रुक – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर वाढीच्या आंदोलनाची सांगली येथे पडलेल्या ठिणगीचे पडसाद मंगळवारी वाठार ता. कराड येथे उमटलेले पहावयास मिळाले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष दयानंद पाटील, विकास पाटील, रामचंद्र पाटील व बापूराव साळूंखे यांनी महामार्गावर दूध टॅंकर अडवून टॅंकर चालकास दुग्धाभिषेक घातला. यावेळी वाठार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. करोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात दूध विक्रीत 30 ते 40 टक्क्यांची घट झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. सध्या ज्या दराने दूध खरेदी केली जाते. त्यातून दूधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रूपयांची थेट मदत करावी. दूध पावडर निर्मिती आणि निर्यातीवर आलेली बंधने विचारात घेऊन केंद्र शासनाने दूध पावडर स्वतःच बाजार भावानुसार खरेदी करून त्याचा बफरस्टॉक करून ठेवावा. दूध पावडर, बटर आणि तूप यांच्यावरील जीएसटी माफ करावा. केंद्र शासनाने घेतलेला 10 हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय त्वरित रद्द करावा, अशा विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खा. राजू शेट्टी यांनी करत दूध दर वाढीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले. सांगलीत या आंदोलनाला प्रारंभ झाला. त्याची ठिणगी कराड तालुक्यातील स्वाभिमानीच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र असलेल्या वाठार येथे पडली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुधाचा टॅंकर अडवले. टॅंकर चालकास दुग्धाभिषेक घातला. यादरम्यान तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.