Satara : वासोटा किल्ला प्रवेश शुल्कात वाढ

कसबे बामणोली : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कसबे बामणोली व वासोटा किल्ला परिसरात पावसाने थंडावा निर्माण केला असला तरी वन विभागाने वाढवलेल्या प्रवेश शुल्कामुळे स्थानिक व्यावसायिक व बोट चालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वासोटा किल्ला नुकताच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत प्रवेशासाठी प्रति व्यक्ती १५० रुपयांची वाढीव फी निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पर्यटकांच्या खिशाला फटका बसत असून स्थानिक व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे. पावसामुळे शिवसागर तलावात पाणीस्तर वाढला असून परिसर निसर्गरम्य बनला आहे. मात्र, बोटिंग सेवा अनेक वेळा बंद ठेवावी लागल्याने स्थानिक रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच प्रवेश शुल्कवाढीमुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थ व बोट चालकांबाबत वन विभागाने पुनर्विचार करावा व स्थानिकांचे मत जाणून घ्यावे, अशी मागणी स्तानिक करत आहेत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला वासोटा किल्ला आणि बामणोली परिसर पर्यटनासाठी आकर्षण ठरत असला तरी अशा निर्णयांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे, असा सूर व्यक्त केला जात आहे.
आधीच आव्हान… त्यात शुल्कवाढ
वासोटा किल्ल्यापर्यंत पोहोचणे हे आधीच आव्हानात्मक आहे. बोटिंग खर्च, वन परवानगी शुल्क, मार्गदर्शक शुल्क या सर्वांचा मिळून मोठा खर्च होतो. आता प्रवेश शुल्क वाढवल्याने अनेकांना परवडणार नाही, असे मतकाही गडप्रेमींनी व्यक्त केले आहे.
“आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता हा प्रवेश शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला. आधीच पावसामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे आणि त्यात शुल्कवाढ केल्याने पर्यटकांचा ओढा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे वन विभागाने स्थानिकांना व बोट चालकांना विचारात घेऊन पुढील उपाययोजना कराव्यात.
– सागर पवार (स्थानिक बोट मालक चालक, बामणोली)





