पुणे जिल्हा | वसंतराव नाईक पतसंस्थेचा 250 कोटी ठेवींचा टप्पा पार

आळेफाटा, (वार्ताहर)- वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वडगाव आनंद या पतसंस्थेची संस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मातोश्री मंगल कार्यालय आळेफाटा येथे नुकतीच पार पडली, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर देवकर यांनी दिली.
संस्थेने 250 कोटींहून अधिक ठेवींचा टप्पा पार केला असून याहीवर्षी सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर संस्थेने सभासदांसाठी दोन लाख रुपयांचा अपघात विमा उतरविलेला आहे. वार्षिक सभा संस्थेचे चेअरमन नेताजी दादा डोके, व्हा. चेअरमन राजू चौगुले यांसह सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. सभेसाठी मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद उपस्थित होते.
संस्थेच्या मुख्य कार्यालय आळेफाटासाठी 20 गुंठे जागा खरेदी केलेली असून संस्थेचे प्रशासकीय कार्यालयाचे लवकरच सर्व शासकीय मान्यता घेऊन बांधकाम करावयाचे नियोजन असल्याचे चेअरमन डोके यांनी सांगितले. प्रास्ताविक करताना दिनकर देवकर म्हणाले, संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून मुख्य कार्यालयासह तब्बल 10 शाखांद्वारे कामकाज सुरू आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 अखेर सभासद संख्या 11 हजार 35 असून, ठेवी 256 कोटी 72 लाख 58 हजार 835 रुपये इतक्या आहेत. तर कर्जवाटप 178 कोटी 55 लाख 44 हजार 170 रुपये इतके केले आहे. त्यातून रुपये 2 कोटी 23 लाख 62 हजार 470 नफा संस्थेस झाला असल्योन सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले.
दरम्यान संस्थेचे इंटरनल ऑडिटर अॅड. संजय ढेकणे यांची लेण्याद्री देवस्थान ट्रस्टवर अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबदल त्यांचा संचालक मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन उपाध्यक्ष राजु चौगुले यांनी केले तर अध्यक्ष नेताजी दादा डोके यांनी आभार मानले.





