– राजाभाऊ चव्हाण आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करण्यात वसंतदादा पाटील यांचे बहुमोल योगदान आहे. त्यामुळे ते ‘आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार’ ठरतात. शिक्षण, कृषी व सहकार या क्षेत्रामधील त्यांचे निर्णय आजही महत्त्वाचे आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त… महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाची पायाभरणी करताना ज्यांनी आपल्या दूरदृष्टीने, परिश्रमाने आणि जनसेवा भावनेने राज्याच्या प्रगतीला नवा वेग दिला ते नाव म्हणजे वसंतदादा पाटील. शेतकरी कुटुंबात जन्मलेले, संघर्षातून घडलेले आणि सेवाभावातून उभे राहिलेले दादा हे राजकारणातील प्रामाणिकपणा, धैर्य आणि लोकसंग्रह यांचे तेजस्वी उदाहरण मानले जातात. 13 नोव्हेंबर 1917 रोजी सांगली जिल्ह्यातील पद्माळे या छोट्याशा खेड्यात झालेला त्यांचा जन्म पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात मोठा बदल घडविणारा ठरला. ग्रामीण जीवनातील कष्ट, दारिद्य्र आणि शेतकर्यांची सततची झुंज त्यांनी लहानपणीच अनुभवली आणि याच अनुभवांनी पुढे त्यांची राजकारणातील भूमिका आणि लोकसेवा यांना दृढ पाया मिळाला. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वसंतदादांनी सक्रिय सहभाग घेतला. बिसूरचा सत्याग्रह हा त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला ब्रिटिश सत्तेविरुद्धचा महत्त्वाचा उठाव होता. या सत्याग्रहादरम्यान त्यांना अटक करण्यात आली; परंतु तुरुंगातही त्यांनी स्वातंत्र्यासाठीचा लढा थांबवला नाही. सहकार्यांसह ब्रिटिश सैनिकांच्या बंदुका हिसकावून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या प्रतिकारात त्यांच्या खांद्याला गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले, तर त्यांचे एक सहकारी शहीद झाले. जखमी अवस्थेत पुन्हा अटक झालेल्या दादांना बेड्या घालून पुण्याच्या येरवडा तुरुंगात पायी नेण्यात आले. त्या काळी पुणे आजच्या इतके विकसित नसल्यामुळे स्टेशनपासून तुरुंगापर्यंतचा झाडीने व्यापलेला, निर्जन मार्ग पायी चालत जाणे ही घटना त्यांच्या अढळ धैर्याची जिवंत साक्ष आहे. स्वातंत्र्यानंतर दादांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि ग्रामीण विकासास प्राधान्य देत सहकार चळवळीला नवी दिशा दिली. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या उभारणीसाठी त्यांच्या प्रयत्नांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी शेतकर्यांच्या हातात आर्थिक स्वावलंबन येण्यासाठी सहकार हा प्रभावी मार्ग असल्याचे सर्वप्रथम दाखवून दिले. दादांच्या पुढाकाराने अनेक साखर कारखाने उभे राहिले, ज्यामुळे ग्रामीण भागाला रोजगार, विकास आणि आर्थिक स्थैर्य मिळाले. त्यांच्या ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या मंत्राने महाराष्ट्रातील जलसंधारण आणि शेती सुधारणा चळवळीला नवे बळ मिळाले. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले. मात्र सत्ता ही त्यांच्यासाठी अधिकाराचा विषय नव्हता; ती केवळ जनतेच्या सेवेसाठीचे साधन होती. ते नेहमीच साधेपणाने वागत आणि कोणत्याही दिखाऊपणापासून दूर राहत. मुख्यमंत्री असूनही ते नेहमी सामान्य नागरिकांच्या गाठीभेटींना वेळ देत, शेतकर्यांच्या समस्या ऐकून त्यांचे त्वरित समाधान करत. ग्रामीण भागातील लोक त्यांच्या घरी कोणत्याही वेळी येऊन आपली अडचण सांगत आणि दादा ती आपल्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे सोडवण्यासाठी तत्पर असत. म्हणूनच प्रत्येक जण त्यांना दादा म्हणत होते, नेता नाही, तर घरातील मोठा आधार. त्यांच्या कार्यातील सर्वात मोठा, दूरगामी परिणाम करणारा निर्णय म्हणजे विना-अनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण संस्थांना परवानगी देणे. त्या काळात हा निर्णय अत्यंत क्रांतिकारक आणि धाडसी ठरला. उच्च शिक्षणाची दारे केवळ श्रीमंतांसाठी मर्यादित न राहता सर्वसामान्यांसाठी खुली झाली. पुढील काही दशकांत महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण आणि आयटी क्षेत्रात देशभरात अग्रस्थानी पोहोचला. आज जेव्हा लाखो तरुण अभियंता, डॉक्टर, आयटी प्रोफेशनल म्हणून जगभर यशस्वी होताना दिसतात, तेव्हा त्यांच्या यशामागे वसंतदादांचे दूरदर्शी धोरण हा मजबूत पाया दिसून येते. वसंतदादा पाटील हे साधेपणाचे, स्वच्छतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक कोपरा आजही त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहे. सहकार चळवळीची मजबूत परंपरा, ग्रामीण विकासाचे वाढते प्रमाण, जलसंधारणाच्या योजनांचा यशस्वी अवलंब, तांत्रिक शिक्षणात झालेला प्रचंड विस्तार या सगळ्याच्या मध्यभागी वसंतदादांची छाप खोलवर जाणवते. मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन, कृषी व सहकार क्षेत्रामधील निर्णय महत्त्वाचे आहेत. त्यांचे जीवन म्हणजे देशभक्ती, परिश्रम, प्रामाणिकता आणि लोकसंग्रह यांचे अद्भुत मिश्रण. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही महाराष्ट्राच्या प्रगतीचे दिशादर्शक ठरतो. शेतकरी, शेती, सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकास यांचे अध्वर्यू म्हणून त्यांचे नाव इतिहासात सदैव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. लोक आजही आदराने म्हणतात, वसंतदादा पाटील- आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार. – (लेखक स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील पुतळा समिती, पुणेचे अध्यक्ष आहेत)