Vasant More । Shiv Sena : मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुनज आघाडीच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविली. मात्र यात त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर आज (दि. ९जुलै) वसंत मोरे यांनी जाहीररित्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी वसंत मोरे यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंसह शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंवर काय जबाबदारी असणार, याचीही माहिती दिली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “वसंत मोरेंसह आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो लोकसभेआधी आम्ही सर्वजण बघत होतो, वसंतराव काय करतात हे बघत होतो. काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळात शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो, याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतला आहात. त्यामुळे आज तुमचं महत्त्व, काम आणि जबाबदारी फार मोठी आहे. मी शिवबंधन बांधत असताना काहींनी मला आम्हीही शिवसैनिक होतो, असं सांगितलं. ‘मी मुळचा शिवेसनेचा’ – वसंत मोरे दरम्यान शिवबंधन बांधून घेत असताना वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी १६ व्या वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. पण १८ वर्ष पूर्ण न झाल्यामुळे पद मिळाले नव्हते. बारावीची परिक्षा उत्तीर्ण होताच १९९२ साली कात्रजमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो होतो. आज माझ्याबरोबर अनेक लोक शिवसेनेत येत आहेत. मी मुळचा शिवेसनेचा असल्यामुळे माझा आज प्रवेश नाही तर मी स्वगृही परतलो आहे”, असे वसंत मोरे म्हणाले.