मुंबई – एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांचा जामीन पाच फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला. राव यांना वैद्यकीय जामीन गेल्या वर्षी 22 फेब्रुवारीला मंजूर करण्यात आला होता. त्यात 7 जानेवारी 2022 पर्यंत वाढ करण्यात आली होती. उच्च न्यायालयापुढे हे प्रकरण शुक्रवारी ठेवण्यात आले. त्यावेळी न्या. एस. एस. शिंदे आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्या. शिंदे तोंडी म्हणाले, तुम्हाला माहिती आहे तिसरी लाट, तज्ज्ञ म्हणताहेत ती 50-60 दिवस टिकण्याची शक्यता आहे. आघाडीचे करोनायोद्धे आणि पोलीस कर्मचारी करोना संसर्गित होत आहेत. या परिस्थितीत त्यांना कारागृहात पाठवणे शक्य आहे का? आम्ही तुमचे मुद्देसूद म्हणणे ऐकू. मात्र, आम्हाला थोडा श्वास घेण्यास वेळ द्या. गेल्या वर्षी 17 डिसेंबरला नानावटी रुग्णालयाने त्यांचा वैद्यकीय अहवाल दिला होता. त्यात त्यांनी वरवरा हे दैनंदिन गोष्टी करू शकतील, असा उल्लेख त्यात केला होता. राव यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ आनंद ग्रोव्हर म्हणाले, हा वैद्यकीय अहवाल आपल्या आशिलास जामिनात वाढ देण्याचा हक्क देत आहे. न्यायालयाने वकिलांना त्याचे प्रतिज्ञापत्र 28 डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचा आदेश देत चार जानेवारीपर्यंत सुनावणी स्थगित केली होती. न्या. पी. बी. वराळे यांनी या प्रकरणापासून स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर हे प्रकरण विभागीय पीठाकडे सोपवण्यात आले होते.