मुंबई : कवी आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वरवरा राव (वय 80) यांना न्युरॉलॉजिकल आणि युरॉलॉजिकल उपचारांसाठी रविवारी येथील नानावटी रुग्णालयात हालवण्यात आले. त्यांच्यावर गुरवारपासून सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना एनआयए कारागृहात करोनाची बाधा झाली होती.
राव यांच्यावर करोनाचे उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती स्थीर होती. मात्र त्यांना काही न्युरॉलॉजिकल समस्या भेडसावत असल्याचे लक्षात आले. त्यांची न्युरॉलॉजिस्टनी तपासणी केली. त्यात त्यांना डेलिरिअम झाल्याचे निदान करण्यात आले.
त्यांना न्युरॉलॉजिकल आणि युरॉलॉजिकल उपचारांची गरज असल्याने रविवारी पहाटे नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू असताना ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत होते. त्यांचा छातीचा एक्स रे आणि इसीजी नॉर्मल आला आहे, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
एल्गार परिषद प्रकरणातील आणि माओवाद्यांशी संबध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या राव यांना सोमवारी भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले. गेल्या आढवड्यात राव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी कारागृह प्रशासनाकडे राव यांना उपचार देण्याची मागणी केली होती. तेलंगणातील कवी आणि कार्यकर्ता असणारे प्रा. राव गेले 22 महिने कारागृहात आहेत.