Nagar News | मतदान केंद्रावर मतदारांना विविध सोईसुविधा उपलब्ध

अकोले, – अकोले येथील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे, यासाठी तालुका प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदारांना विविध सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी केले.
मतदार संघात व्यापक प्रमाणात मतदार जागृतीसाठी मागील काही दिवसांपासून शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, महिला, सर्वसामान्य नागरिक, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी सहकार्य केले. मतदान जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. मोठ्या संख्येने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे. व्हीलचेअर, प्रथमोपचार पेटी मतदान केंद्रावर काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपचार करता यावे, यासाठी केंद्रावर प्रथमोपचाराची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे. आवश्यकता पडल्यास ठराविक ठिकाणी डॉक्टर व रुग्णवाहिका देखील उपलब्य असणार आहे. ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार मतदान करतील, त्या केंद्रांवर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच रॅम्पची व्यवस्था राहणार आहे. अंध मतदारांसाठी मतदान करताना बॅलेट युनिटवरच असलेल्या ब्रेल लिपीच्या आधारे मतदान करता येणार आहे.
व्होटर स्लिपचे वाटप मतदारांना मतदान करताना अडचण येऊ नये, त्यांना मतदान केंद्र, मतदार यादीतील अनुक्रमांक, भाग क्रमांक सहज उपलब्ध व्हावा यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्पत बार कोड असलेल्या मतदान पत्रिका (व्होटर स्लीप) घरोघरी वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांना बार कोड स्कॅन केल्यावर त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती होण्यास मदत होईल.
मतदार सहायता कक्ष
अकोले मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदान सहायता कक्ष स्थापन केला जाणार आहे. ज्या मतदारांना व्होटर स्लीप प्राप्त झाल्या नसतील, त्यांना या केंद्रात त्या उपलब्ध होतील. मतदारांना आवश्यक साहाय्य केंद्रात उपलब्ध मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होतील.
सावलीसाठी मंडप
ज्या मतदान केंद्रांवर सावली नाही अश्या ठिकाणी मंडप उभारण्यात येत आहे. मतदान केंद्रावर एकावेळी जास्त मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर जास्त गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी टेबल-खुर्चीची व्यवस्था केली जाणार आहे. मतदार तसेच निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी मुबलक शुद्ध पिण्याचे पाणी, पाणी पिण्यासाठी ग्लास आणि स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे मतदान केंद्रावर उपलब्ध राहणार आहे.
पाळणाघर, हिरकणी कक्ष
मतदानासाठी बालकांना सोबत घेऊन येणाऱ्या मातांना मतदान केंद्रावर बालकांसाठी पाळणाघराची व हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध प्रकारची खेळणी बालकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास ट्यूबलाईटचो व्यवस्था राहणार आहे





