पिंपरी | जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

पिंपरी, (प्रतिनिधी) – जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व तारांगणच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन दिवस सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमात २७, २८ व २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत छायाचित्र प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खले राहणार आहे. छायाचित्रकार तुषार कोडोलिकर यांनी टिपलेले भारतीय वारसा स्थळांचे फोटो प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.
शुक्रवारी (दि. २७) दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच या वेळेत तज्ञांची व्याख्याने होतील. त्यामध्ये भारतीय वारसा स्थळे, दुर्गभ्रमंती व पर्यटन या विषयी अनुराग वैद्य, विनायक बेलोसे माहती सांगतील.
शनिवारी (दि. २८) नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरील पक्षी, निरीक्षण, पर्यटन आणि संवर्धन या विषयावर सुशांत पवार व्याख्यान देतील. विज्ञान भगीरथीचे भगीरथ या विषयावर रविवारी (दि. २९) विठ्ठल रायकर हे व्याख्यान देतील.
शालेय विद्यार्थांसाठी शुक्रवारी (दि. २७) गिरिदुर्ग व स्थापत्य शास्त्र दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व या विषयावरील आंतरशालेय स्पर्धा देखील होणार आहेत. त्यामध्ये अनेक शाळा सहभागी होतील.
विविध नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेली वारसा स्थळे जपणाऱ्या आपल्या देशात पर्यटन करताना जागरूक व जबाबदार पर्यटक कसे व्हावे, याबद्दल या कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
पर्यटनाची आवड असणारे नागरिक, तसेच शाळांनी हा दिवस साजरा करावा. कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहील, असे आवाहन सायन्स पार्क प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार यांनी केले.





