– माधव विद्वांस भारतीय क्रिकेटमधील विस्मृतीत गेलेले वसंत रांजणे यांचा आज जन्मदिन. सध्या जलदगती गोलंदाजीसारखा क्रिकेटचा खेळही मागे न राहता पुढे चालला आहे. या क्रिकेटला सर्व खेळांचा राजा ज्यांनी बनविले असे जुन्या जमान्यातील खेळाडू व त्यांचे कौशल्यही विसरले जात आहे. त्यांनी घेतलेले कष्ट यांचाही विसर पडला आहे. रांजणे हे त्यातीलच एक क्रीडारत्न. त्यांचा जन्म 22 जुलै 1937 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव वसंत बाबुराव रांजणे. ते अवघ्या दहा वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे वडील एका कारखान्यात कामगार होते आणि आई नायडू हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करायची. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने कष्टाने त्यांना वाढविले. त्यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. ते राहत होते त्याच्या बाजूलाच शिवाजी प्रीपेरेटरी स्कूल होते. शाळेच्या मैदानाचे कुंपणाच्या जाळीतून आतमध्ये मुले क्रिकेट खेळतात हे दिसायचं. त्यावेळी मधुसुदन रेगे स्कूलचे कोच होते. एकलव्याप्रमाणे वसंत त्यांना त्या नेटमधूनच पाहून बॉलिंग शिकले. ही गोष्ट संगमवाडी क्रिकेट क्लबला समजली व त्यांनी वसंत यांना आमच्यासाठी खेळणार का, असे विचारले. अर्थात, उत्तर “हो’ होते. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ होता, पुण्यात दबदबा असलेला विलास क्रिकेट क्लब. या टीमचे देवासचे महाराज आश्रयदाते होते व ते स्वतः सामना पाहण्यासाठी हजर होते. या वेळेसच वसंत रांजणे यांनी पहिल्याच इनिंगमध्ये विलास क्लबचे नऊ गडी बाद केले. देवासच्या महाराजांनी आणि विलास क्लबचे कोच दिवाडकर यांनी रांजणे यांना सांगितलं की उद्यापासून तुम्ही विलास क्लबसाठी खेळायचे आहे. अशा प्रकारे क्रिकेटचे दार त्यांच्यासाठी खुले झाले. वर्षभरातच रांजणे यांचा महाराष्ट्राच्या संघात समावेश झाला आणि वर्ष 1956-57 मध्ये सौराष्ट्रविरुद्ध त्यांना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यातही त्यांनी पुन्हा एकदा एकाच सत्रामध्ये हॅट्ट्रिकसह 5 धावांत 9 खेळाडू बाद केले. या कौशल्यपूर्ण खेळामुळे त्यांचा भारत संघात समावेश झाला. दोन वर्षांनंतर त्यांनी ग्रीन पार्क, कानपूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळली. पहिल्याच सत्रामधे त्यांनी धोकादायक बॉलिंग केली. रांजणे आपल्याला धोका निर्माण करू शकतात हे ध्यानात आल्याने त्यावेळचा वेस्ट इंडिज बॉलर हॉल यांनी त्यांच्यावर बाउंसरची बरसात केली. त्यातील एक बॉल मांडीवर लागला आणि ते जायबंदी झाले. ते पुन्हा त्या मॅचमध्ये बॉलिंग करू शकले नाहीत. तीन वर्षांनंतर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात परत बोलावण्यात आले. त्यावेळी त्यांनी तीन कसोटीत दहा विकेट्स घेतल्या. यानंतर वर्ष 1961-62 मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा झाला. मात्र, त्यांना फक्त शेवटच्या सामन्यात संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी कॉनरॅड हंट, रोहन कन्हाय, गॅरी सोबर्स आणि फ्रॅंक वॉरेल यांच्या विकेट घेतल्या. पुढे 7 वर्षांच्या कालखंडात फक्त सात आंतरराष्ट्रीय सामने खेळून त्यांची कारकीर्द थांबली. 22 डिसेंबर 2011 रोजी त्यांचे निधन झाले.