– माधव विद्वांस मलेरियाचे जंतू शोधक, नोबेल पारितोषिक विजेते रोनाल्ड रॉस यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म भारतात उत्तराखंडातील अल्मोरा येथे 13 मे 1857 रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी, त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या काका-काकूंकडे इंग्लंडला पाठवण्यात आले. त्यांनी राइड येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले आणि माध्यमिक शिक्षण स्प्रिंगहिल येथील बोर्डिंग स्कूलमध्ये घेतले. वर्ष 1874 मधे लंडनमधील सेंट बार्थोलोम्यू मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तरीही वर्ष 1879 मध्ये त्यांनी इंग्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या परीक्षा दिल्या; पण प्रत्यक्षात ते वर्ष 1881 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. केल्या आणि सोसायटी ऑफ अपोथेकरीजच्या परवानाधारकाचा अभ्यास करत असताना त्यांनी ट्रान्सअटलांटिक स्टीमशिपवर जहाजाचे सर्जन म्हणून काम केले. आर्मी मेडिकल स्कूलमध्ये चार महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांची 5 एप्रिल 1881 रोजी भारतात चेन्नई येथे प्रेसिडेन्सीला नियुक्त केलेल्या भारतीय वैद्यकीय सेवेत सर्जन म्हणून नियुक्ती करण्यात आली. कालांतराने पुढे 1888-89 या काळात त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथून पब्लिक हेल्थ या विषयातील पदविकेसाठी जीवाणूशास्त्र हा अभ्यासक्रम निवडला. रॉस सैन्य दलात भरती होण्यासाठी वर्ष 1881 रोजी भारतात आले. या काळात चेन्नई, म्यानमार (ब्रह्मदेश), बलुचिस्तान, अंदमान बेट, बंगलोर आणि सिकंदराबाद येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व ठिकाणी डासांच्या व्युत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचं आहे, हे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, वर्ष 1894 मध्ये ते सुट्टीसाठी लंडनला गेले. त्यावेळी प्रसिद्ध शास्त्रज्ञ व संशोधक सर पॅट्रिक मॅन्सन यांची भेट झाली. मॅन्सन यांनी मलेरिया संशोधनातील खऱ्या समस्यांची त्यांना ओळख करून दिली. रॉस 24 एप्रिल 1895 रोजी भारतात परतले आणि मुंबई येथे बॉम्बे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रूजू झाले. तेथे ते मलेरियाचे रुग्ण हुडकून त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करून संशोधन करू लागले. 1897 मध्ये रॉस सिकंदराबाद येथील बेगमपेठ रुग्णालयात कार्यरत होते. तेथे त्यांनी ठिपकेदार पंख असलेले डास एका बरणीत पकडून आणले आणि हुसेन खान या मलेरिया झालेल्या रुग्णाचे रक्त त्या डासांना शोषू दिले. त्यातील एका डासाच्या शरीर विच्छेदनात 24 तासांनंतर काहीच आढळून आले नाही; परंतु पुढे तीन दिवसांनी डासाच्या पोटात 12 मायक्रोन व्यासाच्या गोलाकार पेशी स्पष्ट दिसू लागल्या. या प्रत्येक पेशीत काळ्या रंगाचा रंगद्रव दिसत होता. या तीन दिवसांत दरदिवशी केलेल्या निरीक्षणात डासाच्या पोटातील पेशींचा आकार मोठा होत होता. 4 सप्टेंबर 1897 रोजी त्यांनी ही निरीक्षणे संशोधन पत्रिकेत नोंदवली. पुढे त्यांची बदली कोलकत्ता येथे झाली. तेथे त्यांना असे आढळून आले की, करड्या रंगाच्या डासांनी चावल्यामुळे कावळा, कबुतर, चिमणी अशा पक्ष्यांना रक्तातून मलेरिया होतो. तर तपकिरी रंगाच्या ठिपकेदार पंख असलेल्या डासामुळे माणसात मलेरिया होतो. मात्र, पक्ष्यांना होत नाही. जंतूंचा शोध लागल्यामुळे त्याच्यावर उपाय शोधण्यास मदत झाली. त्यांचे हे संशोधन जगाला उपयोगी पडले. भारतासह अनेक देश मलेरियाने त्रस्त आहेत, पण उपचार पद्धतीमुळे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. 16 सप्टेंबर 1932 रोजी त्यांचे निधन झाले.