विविधा : मनोहर दिवाण

भारतात कुष्ठरोग सेवेचा पाया घालणारे व दत्तपूर येथे पहिला कुष्ठरोग आश्रम स्थापन करणारे गांधीवादी विचारवंत मनोहर दिवाण यांचे आज पुण्यस्मरण. मनोहर दिवाण यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा या गावी दि. 20 नोव्हेंबर 1901 रोजी झाला. एक हुशार विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात. ते मुंबईच्या जे जे स्कूलमधून ड्रॉइंगच्या तीन परीक्षा उत्तीर्ण झाले होते.
वर्ष 1919 मध्ये ते मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथमश्रेणीत प्रथम येऊन उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यापूर्वी हायस्कूलमध्ये इंटरच्या वर्गात असताना त्यांनी 1921 मध्ये महात्मा गांधींच्या आवाहनानुसार कॉलेज सोडले व खामगाव येथे टिळक राष्ट्रीय विद्यालय या संस्थेची स्थापना करण्यात पंधेगुरुजी व इतरांसोबत सहभागी झाले. मनोहर दिवाणांना “महात्मा दिवाण’ या नावाने महात्मा गांधी स्वत: संबोधित असत. दिवाणांची तसेच त्यांच्या कार्याची नव्या पिढीला फारसा परिचय नाही. ते विठ्ठल भक्त होते. तरुणपणी मनोहरजींनी खामगाव ते पंढरपूर अनेकदा पायी वारी केली होती.
सुरुवातीस गांधीजींच्या कार्यक्रमात कुष्ठरोगी सेवेचा समावेश नव्हता. मात्र, मनोहरजींनी विनोबांची परवानगी मिळविली व डॉ. जगन्नाथ महोदय यांच्या सहयोगाने कुष्ठरोगी सेवाकार्य सुरू केले. यासाठी त्यांनी स्वतः रायपूर जवळील मिशनऱ्यांच्या संस्थेत त्यांनी उपचाराचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी जेव्हा संस्था उघडण्याचे ठरविले, तेव्हा ते कोलकत्ता येथील स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेत प्रशिक्षणासाठी पोहोचले. तेथे फक्त डॉक्टरांना प्रवेश मिळत असे. परंतु मिशनरी लोकांच्या शिफारशीमुळे मनोहरजींना प्रवेश मिळाला.
वर्ष 1936 मध्ये त्यांनी महारोगी सेवा मंडळाची स्थापना केली व कुष्ठरोग्यांच्या सेवेला वाहून घेतले. दत्तपूर येथे त्यांनी कुष्ठधाम स्थापन केले व स्वतः आईसोबत तेथे राहू लागले. गांधीजींच्या आश्रमात असताना दिवाण डोंगरावरच्या दत्तमंदिरात गेले होते. त्यांना तेथे एक विकलांग कुष्ठरोगी दिसला. मनोहरजींनी त्याला पाठीवर घेऊन बारा मैल प्रवास केला होता. त्यास दत्तपूर आश्रमात भरती केले. वर्ष 1942 मध्ये “भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. त्यांना तुरूंगवास झाला.
तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी पुन्हा महारोगी सेवा सुरू केली. त्यांनी खऱ्या अर्थाने दीनदुबळ्यांसाठी केलेल्या समाजसेवेचे प्रतीक म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री जाहीर केली. मात्र, मनोहरजींनी नम्रपणे हा पुरस्कार नाकारला. शेवटी विनोबाजींनी गळ घातली, “तुमच्यासाठी नाही, या रुग्णांसाठी पद्मश्री स्वीकारा.’ विनोबाजींचा शब्द प्रमाण मानून मनोहरजींनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. त्यांनी “कुष्ठरोगापासून वेदापर्यंत’ अशा अनेक विषयांवर मराठीत आणि हिंदीत अनेक ग्रंथ लिहिले.
वर्धा येथे त्यांना एका सायकलरिक्षाने ठोकरले व त्यात ते जखमी झाले. त्यांना दवाखान्यात दाखल केले; परंतु त्यातच 15 फेब्रुवारी 1980 रोजी त्यांचे निधन झाले. मनोहरजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुष्ठधामाचे नाव “मनोहर आरोग्य निकेतन’ असे ठेवण्यात आले.
माधव विद्वांस





