Gold Donation : तिरुमला मंदिराला 121 किलो सोन्याचे दागिने दान करणारे वर्धमान जैन कोण? 208 कोटींच्या देणगीने देशभर चर्चा
Gold Donation : चेन्नईचे उद्योगपती वर्धमान जैन आणि पत्नी राधिका जैन यांनी तिरुमला मंदिराला १२१ किलो सोन्याचे दागिने दान केले. जाणून घ्या त्यांची ओळख, व्यवसाय आणि सामाजिक कार्य.

Gold Donation : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराला १२१ किलो सोन्याचे दागिने दान करण्यात आले आहेत. चेन्नईतील उद्योगपती वर्धमान जैन आणि त्यांच्या पत्नी राधिका जैन यांनी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी हे दान केले. या दागिन्यांची किंमत सुमारे २०८ कोटी रुपये असल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) प्रशासनाकडे हे दागिने सुपूर्द करण्यात आले.
या दानामुळे वर्धमान जैन यांची देशभर चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला दानकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांची ओळख समोर आली. टीटीडीच्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीकडून भगवान व्यंकटेश्वरांना मिळालेल्या सर्वात मोठ्या देणग्यांपैकी हे एक दान आहे.
कोण आहेत वर्धमान जैन?
वर्धमान जैन हे चेन्नईतील प्रसिद्ध उद्योजक असून ते ‘ॲक्सेस हेल्थकेअर’ (Access Healthcare) या कंपनीचे संस्थापक आणि उपाध्यक्ष आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रातील तंत्रज्ञान, संगणक प्रणाली आणि व्यावसायिक सेवा या क्षेत्रांत त्यांनी काम केले आहे.
त्यांनी चेन्नईतील लोयोला महाविद्यालयातून सांख्यिकी विषयात पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून संगणकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. व्यवसाय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी डेल सर्व्हिसेसच्या बीपीओ विभागात व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीच्या कामकाजाचा विस्तार करण्याची जबाबदारी सांभाळली.
त्यानंतर त्यांनी ॲक्सेस हेल्थकेअर कंपनीची स्थापना केली. आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपन्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक आणि प्रशासकीय कामकाज अधिक सोपे करण्यासाठी ही कंपनी सेवा पुरवते. ते एशिया इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
१२१ किलो सोन्याच्या दानात काय आहे?
वर्धमान जैन दाम्पत्याने एकूण ४६ प्रकारचे दागिने नऊ संचांमध्ये तयार करून दिले आहेत. यामध्ये सोन्याचा मुकुट, हार, पैंजण, कंबरपट्टा, हातातील दागिने आणि इतर अलंकारांचा समावेश आहे. काही दागिन्यांमध्ये हिरे आणि मौल्यवान रत्नांचाही वापर करण्यात आला आहे.
या एकूण दानापैकी १०६ किलो सोन्याचे दागिने भगवान व्यंकटेश्वरांसाठी आहेत. तर उर्वरित १५ किलो सोन्यापासून देवी पद्मावती यांच्यासाठी वस्त्र तयार करण्यात आले आहे. या दागिन्यांमध्ये २३८.२ कॅरेट वजनाचे हिरेही आहेत.
व्यवसायासोबत समाजसेवेवरही भर
वर्धमान जैन केवळ व्यावसायिक क्षेत्रातच सक्रिय नाहीत, तर सामाजिक कामांमध्येही त्यांचा सहभाग आहे. चेन्नईतील कांची कामकोटी चिल्ड्रन्स ट्रस्ट रुग्णालयाचे ते विश्वस्त आहेत. या रुग्णालयाच्या माध्यमातून मुलांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या कामात त्यांचा सहभाग आहे.
‘श्री सरिता जैन फाउंडेशन ट्रस्ट’च्या माध्यमातून ते गरजू लोकांना अन्न, शिक्षण आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी काम करतात. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘आविष्कार’ हा उपक्रमही सुरू केला आहे.
तिरुमला मंदिराला यापूर्वीही त्यांनी विविध प्रकारची मदत केली आहे. मंदिराच्या वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस आणि श्री वेंकटेश्वर भक्ती वाहिनीसाठी आर्थिक मदत अशा स्वरूपाचे त्यांचे यापूर्वीही योगदान राहिले आहे.
वर्धमान जैन यांचे हे दान केवळ सोन्याच्या किमतीमुळे नव्हे, तर त्यामागील धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक योगदानामुळेही चर्चेत आले आहे.




