संगमनेर, (प्रतिनिधी) – तालुक्याच्या पठार भागातील डोंगराळ भागातील वनकुटे गाव नेटवर्क उपलब्ध नसल्याने गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.
अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
वनकुटे हे गाव पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून बारा किलोमीटरवर आहे. या गावची लोकसंख्या साडेतीन हजारांच्या दरम्यान आहे. पेमरेवाडी या ठिकाणी BSNLया सरकारी कंपनीचा टाॅवर झाला आणि हे गाव नेटवर्क क्षेत्रात आले.
त्यामुळे नागरीक एकमेकांच्या अगदी जवळ संपर्कात आले व डिजीटल युगात वावरत असताना शासकीय सेवेचा लाभ घेताना आॅनलाईनचा मोठा फायदा गावाला झाला.
परंतु कालांतराने ही सेवा विस्कळित झाली असून नागरिकांना डिजिटल युगात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या समस्येसाठी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना वेळोवेळी कळवूनही ते जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
BSNL ही सरकारी कंपनी असल्याने व महागाईच्या काळात माफक दरात सेवा उपलब्ध करून देत असल्याने घारगाव, बोरबन, कोठे, वनकुटे, भोजदरी, पेमरेवाडी, दारसोंडवाडी, खांडगेदरा आदी भागात अनेक ग्राहक आहेत.
मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे BSNL म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने या भागातील सेवा सुरळीत करण्यात यावी,
अन्यथा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वनकुटे गावचे माजी सरपंच सुरेश हांडे, पोलीस पाटील भरत पोखरकर, रामचंद्र हांडे, भिमाजी पाबळे, सीताराम हांडे, संदीप हांडे,अशोक हांडे, शांताराम पोखरकर यासह नागरिकांनी दिला आहे.