प्रचाराला लागण्याची प्रकाश आंबेडकर यांची सूचना
पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या विजयासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले असून कलाटे यांना विजयी करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी लेखी पत्राद्वारे केले आहे. त्यामुळे आघाडीचा आज (शनिवारी) पासून प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. कलाटे यांना यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेससह विविध पक्षांनी पाठींबा दिला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कलाटे यांना पाठींबा जाहीर केला होता. त्यामुळे कलाटे सर्वपक्षीय उमेदवार ठरले आहेत.
आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नुकतेच लेखी पत्र देत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कलाटे यांच्या विजयाचा संकल्प सोडला आहे. कार्यकर्त्यांनी आजपासून मतदार संघात झंझावाती प्रचार सुरू केला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अल्पावधीत पिंपरी-चिंचवड शहरात आपली ताकद दाखवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते एकवटले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात सुमारे 20 हजार मतदार वंचित बहुजन आघाडीला मानणारे आहेत. त्याचा फायदा कलाटे यांना होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चिंचवड विधानसभेसाठी कलाटे यांना आपला पाठींबा असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्व कार्येकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सुरुवात करावी. कलाटे हे विजयी होतील याची काळजी घ्यावी, अशा सूचना आंबेडकर यांनी केल्या आहेत. आंबेडकर यांचा आदेश प्राप्त होताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला आहे.
सोसायटीधारकांकडून उत्स्फूर्त स्वागत – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी “वीकएंड’ची संधी साधत वाकड, रहाटणी, थेरगाव परिसरातील सुमारे 20 हून अधिक सोसायट्यांमधील नागरिकांशी संवाद साधला. मतासाठी नव्हे विकासासाठी आर्शिवाद द्या, अशी साद त्यांनी आज (शनिवारी) मतदारांना घातली. यावेळी झालेल्या बैठकांदरम्यान सोसायटीमधील रहिवाशांनी कलाटे यांचे दणक्यात स्वागत करीत त्यांना
पाठींबा दिला.
वाकड, थेरगाव, रहाटणी परिसरात आयटी क्षेत्रासह विविध ठिकाणी काम करणाऱ्या नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सलग सुट्टीचे आल्याने आज कलाटे यांनी मतदारांशी संवाद साधला. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेला गाठीभेटींचा दौरा रात्री दहाच्या
सुमारास संपला.