Vamika Gabbi: पंजाबी चित्रपटांमधून अभिनयाची सुरुवात करणारी अभिनेत्री वामिका गब्बी आता बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. छोट्या भूमिकांपासून सुरुवात केलेल्या वामिकाने अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मुख्य अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. ‘ग्रहण’, ‘जुबिली’ आणि ‘खुफिया’सारख्या वेब सिरीज आणि प्रोजेक्ट्समुळे तिची लोकप्रियता वाढली. सध्या ती ‘पति पत्नी और वो दो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वामिकाने सोशल मीडिया ट्रोलिंग, इंडस्ट्रीमधील स्पर्धा आणि कॉमेडी अभिनयाबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत बोलताना वामिका म्हणाली की, सोशल मीडियावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. “आजकाल कुणीही काहीही बोलून निघून जातं. सोशल मीडियावर बोलणाऱ्यांची जबाबदारीच उरलेली नाही. त्यामुळे हे एक प्रकारचं सर्कस बनलं आहे,” असं ती म्हणाली. प्रत्येकाचं अकाउंट व्हेरिफाइड असावं, अशी मागणीही तिने केली. अलीकडेच अभिनेता राजपाल यादव यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वामिकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र तिने या ट्रोलिंगला फारसं महत्त्व दिलं नाही. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना वामिकाने आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दलही मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “माझा होणारा नवरा प्राण्यांवर प्रेम करणारा असावा. त्याने स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. बदल स्वीकारण्याची तयारी असणंही खूप महत्त्वाचं आहे.” नात्यात समजूतदारपणा आणि एकमेकांना स्पेस देणं आवश्यक असल्याचंही तिने सांगितलं. Wamiqa Gabbi चित्रपटसृष्टीतील ‘कॅट फाईट्स’ या चर्चित विषयावर बोलताना वामिकाने मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली, “फक्त कॅट फाईट्सच नाहीत, डॉग फाईट्सही होतात.” प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असते, पण ती आपण कोणासोबत काम करतो यावर अवलंबून असते, असं तिने स्पष्ट केलं. ‘पति पत्नी और वो दो’च्या शूटिंगदरम्यान सारा अली खान, रकुल प्रीत आणि इतर कलाकारांसोबत खूप मजा आल्याचंही तिने सांगितलं. शूटिंगदरम्यान सगळे कलाकार एकत्र प्रवास, जेवण, जिम आणि स्विमिंग करत असल्याने वातावरण खूप आनंदी होतं, असं ती म्हणाली. कॉमेडी भूमिकांबद्दल बोलताना वामिका खूप उत्साही दिसली. “माझ्यातला कॉमेडीचा प्राणी बाहेर काढण्याची खूप गरज आहे,” असं ती हसत म्हणाली. कॉमेडी करणं सोपं नसतं, पण ते करताना तिला प्रचंड आनंद मिळाल्याचं तिने सांगितलं. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्यासोबत ती सतत नवे कॉमिक आयडिया शेअर करत असे. शूटिंगदरम्यान इतकं हसू यायचं की, कधी कधी पोट दुखेपर्यंत हसत असल्याचंही तिने सांगितलं. कॉमेडी हा अभिनयातील सर्वात आव्हानात्मक प्रकार असल्याचं वामिकाचं मत आहे. मात्र एकदा त्या भूमिकेची लय सापडली की कलाकाराला खूप काही करण्याची संधी मिळते, असं ती म्हणाली. पुढे आणखी विनोदी भूमिका करण्याची इच्छा तिने व्यक्त केली.