Valvan Dam – वलवण धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३३ वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश गणपत पालवे (रा. कुरवंडे, लोणावळा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. २९) रात्री ९:४५ च्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पालवे हा आपल्या मित्रांसोबत वलवण डॅमच्या बॅकवॉटर परिसरात पोहण्यासाठी गेला होता. ठाकरवाडी येथील बाळू मामा मंदिराजवळ असलेल्या या परिसरात पोहत असताना योगेशला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्थानिक शिवदुर्ग बचाव आणि शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. महेश मसणे यांनी स्कूबा किट घालून पाण्यात शोध घेतला, तर योगेश दळवी यांनी रोपच्या साहाय्याने शोध मोहिमेत मदत केली. सुमारे पाऊण तास चाललेल्या अथक परिश्रमानंतर मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह शोधण्यासाठी आनंद गावडे, राजेंद्र कडू, मयूर दळवी, दीपक भोरडे, मनोहर ढाकोळ, सागर दळवी, सागर कुंभार, सतीश सगर, नितीन सांगळे, शाम वाल्मिकी, राजेश भालेराव, प्रकाश रत्नाकर, योगेश दळवी, अदिती गायकवाड, स्वप्निल काटे, महेश मसणे आणि सुनील गायकवाड या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. या घटनेची फिर्याद मृताचे मेव्हणे विनोद नारायण आमले (रा. लालटाकी, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस हवालदार शशिकांत खोपडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पर्यटकांनी आणि स्थानिक तरुणांनी पाण्याजवळ जाताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.